सांगली येथील कॅफेमालकांवर गुन्हे नोंद न केल्यास राज्यव्यापी आंदोलन ! – चंदन चव्हाण, राज्यप्रमुख, गुंठेवारी विकास समिती
श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या ‘कॅफे’च्या तोडफोडीचे समर्थन !
सांगली, १९ मे (वार्ता.) – ‘लैंगिक अत्याचारास कारणीभूत ठरणारे कॅफे त्वरित बंद करावेत अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल’, अशी चेतावणी शिवसेनेच्या गुंठेवारी विकास समितीचे राज्यप्रमुख चंदन चव्हाण यांनी दिली. याविषयीचे निवेदन त्यांनी गृहमंत्र्यांना पाठवले आहे. २ दिवसांपूर्वी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला म्हणून ‘कॅफे’च्या केलेल्या तोडफोडीचे समर्थन केले.
चंदन चव्हाण म्हणाले की, आम्ही गृहमंत्र्यांना निवेदन देणार आहोत. गुंगीचे औषध देऊन अत्याचार केला जातो. मुलींना ब्लॅकमेल केले जाते. याकडे पोलिसांचे लक्ष का नाही ? महिला निर्भया पथकाकडून कठोर कारवाईची अपेक्षा आहे. पथकाला पुन्हा प्रभारित केले पाहिजे. निष्क्रिय पोलीस अधिकार्यांना पदमुक्त करा. सांगली येथील प्रकार राज्य सरकारला लाजेने मान खाली घालायला लावणारा आहे. या कॅफेवाल्यांना कुणाचे अभय आहे ? पुढील ८ दिवसांत कारवाई न झाल्यास मुंबईतील आझाद मैदानात राज्यव्यापी आंदोलन केले जाईल. कॅफेमालकांवरही गुन्हे नोंद करावेत. पोलिसांनी कठोर कारवाई केली, तर आंदोलन थांबवू.
संपादकीय भूमिका :अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून तत्परतेने कारवाई का करत नाही ? |