कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर हिला प्रसाद भांडारातील सेवा शिकतांना लक्षात आलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

कु. श्रिया राजंदेकर

१. लक्षात आलेली सूत्रे

अ. मी साधकांना प्रसाद देत असतांना कधी कधी त्यांचा भाव जागृत होऊन त्यांच्या डोळ्यांतून पाणी येते. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टर यांच्याप्रती भाव कसा असायला हवा ? कृतज्ञताभाव कसा असायला हवा ?’, हे माझ्या लक्षात आले.

आ. मी साधकांना प्रसाद देते. त्या वेळी ‘परात्पर गुरुदेवांचे चैतन्य त्या साधकापर्यंत पोचवण्याची संधी मला मिळत आहे’, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते आणि ‘हे परात्पर गुरुदेव, आपल्याच कृपेने मला हा प्रसाद देण्याची संधी मिळत आहे. या सेवेप्रती माझ्या मनात अखंड कृतज्ञताभाव राहू दे. ही सेवा आपल्याला अपेक्षित अशी होऊ दे. यामध्ये कुठेही माझे कर्तेपण येऊ नये, अशी आपल्या चरणी भावपूर्ण प्रार्थना करते.’

२. परात्पर गुरु डॉक्टरांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

२ अ. परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातून प्रसाद भांडारात येतात’, असे जाणवणे आणि त्यानंतर उत्साह अन् आनंद अधिक प्रमाणात जाणवणे : कधी कधी प्रसाद भांडारात मी एकटीच असते, तरी त्या वेळी मला एकटेपणा जाणवत नाही. तेव्हा मला ‘प.पू. गुरुदेव दारातून प्रसाद भांडारात येत आहेत’, असे वाटते; म्हणून मी दाराकडे बघते, त्या वेळी तिथे कुणीच नसते. तेव्हा ‘प.पू. गुरुदेव सूक्ष्मातून प्रसाद भांडारात येतात’, असे मला जाणवते. त्यानंतर मला नेहमीच्या तुलनेत अधिक प्रमाणात उत्साह आणि आनंद जाणवतो.

२ आ. ‘परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातून स्वयंसूचना सत्र करून घेतात’, असे जाणवणे : प्रसाद भांडारात असतांना मी स्वयंसूचना सत्र करते. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातून माझ्यासमोर येऊन बसतात आणि ते माझ्याकडून स्वयंसूचना सत्र करून घेतात’, असे मला जाणवते. तेव्हा ते सत्र माझ्या अंतर्मनापर्यंत जाते आणि त्यानुसार आपोआप प्रयत्न चालू होतात.

२ इ. परात्पर गुरु डॉक्टर प्रसादाच्या माध्यमातून साधकांच्या मनातील नकारात्मकता दूर करून त्यांना आनंद देत असणे : मी साधकांना प्रसाद देतांना कधीकधी साधकांना अनुभूती येते की, ‘त्यांच्या मनात नकारात्मक विचार अथवा त्यांना काही साधनेसंदर्भात अडचण असते, त्या वेळी त्यांना प्रसाद मिळतो.’ ही अनुभूती मी ऐकल्यावर मला असे वाटते, ‘मी जरी स्थुलातून प्रसाद देत असले, तरी तो परात्पर गुरुदेवच योग्य वेळी त्या ठिकाणी पोचवतात आणि त्या प्रसादाच्या माध्यमातून ते त्या साधकांना आनंद देतात.’ परात्पर गुरुदेव साधकांच्या मनातील नकारात्मकता दूर करतात. त्यांचे प्रत्येक साधकाकडे लक्ष असते.

३. प्रसाद भांडारात सेवा केल्यापासून साधिकेमध्ये वृद्धींगत झालेले गुण

३ अ. इतरांचा विचार करणे : पूर्वी ‘इतरांचा विचार करणे’ हा गुण माझ्यामध्ये अत्यल्प होता; पण मी प्रसाद भांडारात सेवा करू लागल्यापासून माझ्यामध्ये या गुणाची वाढ झाली आहे, उदा. ‘साधकांना प्रसाद देतांना त्या साधकांना काही पथ्य आहे का किंवा ते वयस्कर असतील, तर त्यांना चावण्याची अडचण आहे का ?’, हे सर्व पाहून मी त्या साधकांना प्रसाद देते. या कृती करत असतांना मला माझे अस्तित्व जाणवत नाही. याचे चिंतन केले, तेव्हा ‘त्या वेळी परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व कार्यरत असते; म्हणून मला माझे अस्तित्व जाणवत नाही’, असे मला वाटले.

३ आ. पुढाकार घेऊन सेवा करणे : पूर्वी माझ्यामध्ये पुढाकार घेऊन सेवा करण्याचा भाग अल्प होता. त्यामुळे उत्तरदायी साधिकेने सांगितली तेवढीच सेवा मी करायचे; पण आता मी कुठली सेवा करायची राहिली असेल, तर ती लगेच पुढाकार घेऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न करते.

४. कृतज्ञता

परात्पर गुरु डॉक्टर, आपल्या अनंत कृपेने मला प्रसाद भांडारात सेवा करण्याची संधी मिळत आहे. या अनुभूती आपणच मला दिल्या आणि त्यांचे लिखाणही आपणच करून घेतले, याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. श्रिया राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय १२ वर्षे), फोंडा, गोवा. (४.२.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक