पुण्यासह सांगली, मिरज, कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वेस्थानके बाँबने उडवून देण्याची धमकी देणार्यास मुंबई येथे अटक !
सांगली, १९ मे (वार्ता.) – पुण्यासह सांगली, मिरज, कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वेस्थानके बॉंबने उडवून देण्याची दूरभाषद्वारे धमकी देणारा आरोपी सचिन शिंदे याला सांगली पोलिसांनी मुंबई येथून अटक केली. सचिन हा सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडगाव येथील रहिवासी आहे. आरोपी सचिन याने हा गुन्हा केला असल्याचे मान्य केल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. सांगली शहर पोलिसांनी मुंबई लोहमार्ग पोलिसांचे साहाय्य घेऊन आरोपीला अटक केली. (कुणीही उठतो आणि बाँबस्फोट करण्याची धमकी देतो, हा खेळ झाला आहे. पोलिसांनी त्यांचा वचक निर्माण न केल्यास हे प्रकार वाढत जातील, हे निश्चित ! – संपादक)
काही दिवसांपूर्वी सांगली पोलिसांना वरील रेल्वेस्थानके बाँबस्फोटांनी उडवून देण्याचा दूरभाष १३ मे या दिवशी आला होता. प्रारंभी हा धमकीचा दूरभाष ‘मॉकड्रिल’ असल्याचा समज पोलिसांना झाला होता; मात्र धमकीचा दूरभाष खरोखरच आला आहे, हे पोलिसांना समजले. (‘मॉकड्रिल’ म्हणजे आग लागल्यास, भूकंप अथवा आतंकवादी आक्रमण झाल्यास काय करावे ? यासाठी कर्मचारी, जनता, विद्यार्थी, पोलीस इत्यादींना प्रशिक्षण देण्यासाठी त्याप्रकारची खोटी परिस्थिती निर्माण केली जाते, त्याला ‘मॉकड्रिल’ असे म्हणतात.) त्यानंतर पोलिसांनी सर्व रेल्वेस्थानकांची कसून पडताळणी केली असता, त्यांना कोणत्याही स्थानकावर बॉंबसदृश्य वस्तू आढळली नाही; उलट रेल्वे पोलिसांसह रेल्वेच्या सर्व कर्मचार्यांना विनाकारण मानसिक त्रास झाला; मात्र पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन अन्वेषण चालू केले. त्यानुसार १८ मे या दिवशी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून आरोपी सचिन शिंदे याला पोलिसांनी अटक केली.
संपादकीय भूमिका :वारंवार बाँबस्फोटांची धमकी देऊन पोलिसांना नाहक त्रास देणार्या आरोपींना कठोर शिक्षा कधी होणार ? |