श्री तुळजाभवानी मंदिरात प्रशासनाकडून केवळ सशुल्क दर्शन घेणार्यांची सोय !
सर्वसामान्य भाविकांना देवीचे दर्शन सुलभ होण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी !
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – येथील श्री तुळजाभवानी मंदिरात देवीचे दर्शन घेण्यासाठी सशुल्क दर्शन रांग आणि निशुल्क दर्शन (धर्म-दर्शन) रांग अशी वेगवेगळी सोय करण्यात आली आहे. सशुल्क दर्शन रांग आतील बाजूस असल्याने, धर्म-दर्शन रांगेतील भाविकांना देवीचे मुख दर्शन होण्यात अडथळे निर्माण होत आहेत. देवीच्या दरबारात श्रीमंत-गरीब असा भेद न करता सर्वांना दर्शनाची सोय करण्यात यावी, अशी मागणी भाविकातून करण्यात येत आहे. (अशी मागणी का करावी लागते ? हे मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम नाहीत का ? – संपादक)
देवीच्या दर्शनाला येणार्या भाविकांत गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे त्यांना दोन ते तीन घंटे रांगेत उभे रहावे लागत आहे. एवढा वेळ रांगेत थांबल्यानंतर प्रत्यक्ष दर्शन करतांना सशुल्क दर्शन रांगेतील गर्दीमुळे देवीचे मुखदर्शन घेण्यात अडचण येते. त्यातच अनेक वयोवृद्ध, लहान मुले आणि महिला यांना अल्प उंचीमुळे देवीचे मुख दर्शनच घडत नाही. धर्म-दर्शन रांगेतील भाविकांनाही श्री तुळजाभवानीदेवीचे दर्शन व्हावे, यासाठी सिंह गाभार्यात लाकडी जिना करावा किंवा चोपदार दरवाजा भागात बसवलेली लादी काढून तो भाग खोलगट करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. (मंदिर समितीनेच खरेतर भाविकांची सोय पहाणे आवश्यक आहे. – संपादक)