कोल्हापूर येथे दोन बांगलादेशी महिलांना अटक

सांगलीतून आधारकार्ड, शिधापत्रिका सिद्ध करून घेतल्याचे उघडकीस !

बांगलादेशी घुसखोर

कोल्हापूर – कोल्हापूर पोलिसांनी हमिदा बेगम (खोटे नाव – सुमन राधेशाम वशिष्ठ) आणि खुशी शहाबुद्दीन शेख या दोन बांगलादेशी घुसखोर महिलांना अटक केली आहे. या दोघींकडे बनावट आधारकार्ड आणि शिधापत्रिका सापडली असून ते सांगलीतून सिद्ध केल्याचे समोर आले आहे. या दोघींकडे पॅनकार्डही सापडले आहे. संशयित महिला डिसेंबर २०२३ मध्ये कोल्हापूर येथे वास्तव्यास आल्या. या दोघी कुणाच्या मध्यस्थीने कोल्हापूर येथे आल्या ? याचे अन्वेषण पोलीस करत आहेत. या संदर्भात देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करणार्‍या घटकांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी करवीर पोलिसांना दिल्या आहेत.

या विषयावर दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी विविध मान्यवरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्या खालीलप्रमाणे…

शांतताप्रिय म्हणणार्‍या कोल्हापूरमध्ये हे संकट आता दारापर्यंत ! – किशोर घाटगे, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना

कोल्हापूर येथे बांगलादेशी महिला सापडणे, ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही उंचगाव-गांधीनगर येथे अशा घटना घडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुसलमान मुले कोल्हापूर येथे आणि मिरज येथे सापडली होती, त्यांचे अन्वेषण पुढे काय झाले ? ते समोर आलेच नाही. एका घटनेत अन्वेषण करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण यंत्रणांचे पथकही कोल्हापूर येथे धडकून गेले. त्यामुळे त्या यंत्रणांना माहिती आहे आणि आपल्याकडील पोलिसांना माहिती नाही, असे होऊ नये, यासाठी याचे सखोल अन्वेषण होणे आवश्यक आहे. कथित पुरोगामी जे सतत सर्वधर्मसमभावाचा ढोल बडवतात, त्यांना तरी आता शांतताप्रिय म्हणणार्‍या कोल्हापूरमध्ये हे संकट आता दारापर्यंत आले आहे, हे लक्षात येत आहे का ? अन्वेषण यंत्रणांनी आता गाफील न रहाता कठोर पावले उचलणे आवश्यक आहे !

हे एक प्रकरण समोर आले आहे, तरी अशा सर्व प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे ! – दीपक देसाई, जिल्हाध्यक्ष, हिंदू एकता आंदोलन, कोल्हापूर

हे केवळ समोर आलेले एक प्रकरण आहे, शहरात आणि जिल्ह्यात अशी प्रकरणे असतील, त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. अशा प्रकरणांच्या विरोधात हिंदू एकता आंदोलन सातत्याने आवाज उठवत आहे. केवळ यात २ महिलांना अटक झाली, एवढ्यापुरते न थांबता यामागील सूत्रधार शोधला पाहिजे. या संदर्भात लवकरच आम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहोत आणि कठोर कारवाईची मागणी करणार आहोत.

बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढा आणि त्यांच्या देशात परत पाठवा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती, राज्य संघटक महाराष्ट्र आणि छत्तीसगड

ही घटना उघडकीस येण्याच्या अगोदर जानेवारी महिन्यात पुण्यात अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या ५ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. या सर्वांनी गोवा येथून पारपत्र सिद्ध करून घेतले होते. फेब्रुवारी महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या १० बांगलीदेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. मार्च महिन्यात नवी मुंबई येथे अवैधरित्या रहाणार्‍या ८ बांगलादेशी नागरिकांच्या विरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यात ५ महिला आणि ३ पुरुष यांचा समावेश आहे. याचा अर्थ प्रत्येक थोड्या थोड्या कालावधीनंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवैधरित्या बांगलादेशी घुसखोर सापडत आहेत. ही देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर गोष्ट असून याची पाळेमुळे खणून काढणे अत्यावश्यक आहे. या नागरिकांना बांगलादेशमधून येथे आणणारा सूत्रधार कोण ? त्यांना पारपत्र कोण बनवून देतो ? यांचे स्थानिक पाठीराखे कोण याचा शोध घेतला पाहिजे ! त्यामुळे राज्यातील संशयित ठिकाणी ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवून बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढा आणि त्यांच्या देशात परत पाठवा, अशी मागणी आम्ही राज्य सरकारकडे करतो.

भाडेकरू ठेवतांना नागरिकांनीही पूर्ण चौकशी करावी ! – विजय खाडे, भाजप युवामोर्चा, अध्यक्ष, कोल्हापूर

अशा प्रकारचे लोक हे विविध खोटी नावे धारण करून रहातात. त्यामुळे नागरिकांनीही कुणाला भाड्याने खोली देतांना त्याची चौकशी करूनच त्यांना भाडेकरू म्हणून ठेवावे. काही संशयास्पद वाटल्यास लगेचच पोलिसांना कळवावे. अशांना आधारकार्ड, शिधापत्रिका कोण सिद्ध करून देतात, त्याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे. या दोघी थेट भारतात कशा आल्या ? त्यांना येथे येण्याच्या अगोदर कुणी आसरा दिला ? याचे अन्वेषण झाले पाहिजे.

संपादकीय भूमिका :

बांगलादेशींच्या हस्तकांची पाळेमुळे खणून काढून त्यांच्यावरही कारवाई करणे आवश्यक !