साधकांना घडवण्यासंदर्भात जाणवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये !

‘जानेवारी २०२४ मध्ये मी काही कामानिमित्त गावी गेले होते. परतीच्या प्रवासात रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येत असतांना मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भातील पुष्कळ प्रसंगांचे स्मरण होत होते. त्या वेळी मला त्यांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. मला वाटले, ‘परात्पर गुरु डॉक्टरांसारखे दुसरे कुणीही होऊ शकत नाही.’ त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांच्या पुढील काही अद्वितीय गोष्टी माझ्या लक्षात आल्या.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कठीण विषय सोपा करून समोरच्या व्यक्तीला सहजतेने शिकवण्याची कला अवगत असणे

परात्पर गुरु डॉक्टरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे कितीही कठीण विषय असला, तरीही तो सोपा करून समोरच्या व्यक्तीला सहजतेने शिकवण्याची कला परात्पर गुरु डॉक्टरांना अवगत आहे. याची २ – ३ उदाहरणे पुढे दिली आहेत.

१ अ. साधकांना अल्प वेळेत नियोजन करायला शिकवणे : वर्ष २००५ मध्ये एका साधिकेला आश्रमातील स्वच्छतेचे नियोजन करायला एक ते दीड घंटा लागत होता. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्या साधिकेला ‘स्वच्छतेचे नियोजन १० ते १५ मिनिटांमध्ये कसे करायचे ?’, हे शिकवले.

१ आ. साधकांना सूक्ष्म परीक्षण करायला शिकवणे : साधकांना ‘सूक्ष्म परीक्षण कसे करायचे ?’, याविषयी ठाऊक नव्हते. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना त्याविषयी शिकवले. आज सनातनचे अनेक साधक एखादा कार्यक्रम, वास्तू, सण, मंदिर किंवा मूर्ती आदी अनेक विषयांच्या संदर्भात सूक्ष्म परीक्षण करत आहेत.

१ इ. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना ‘प्राणशक्तीवहन पद्धती’नुसार उपाय कसे करायचे ?’, याविषयी शिकवले. आध्यात्मिक त्रास होत असतांना साधक या पद्धतीने स्वतःच स्वतःवर उपाय करून स्वावलंबी होत आहेत.

१ ई. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने साधक त्याच्या क्षेत्राशी संबंधित नसलेली सेवा करू शकणे : सनातन आश्रमात वेगवेगळ्या क्षेत्रांत शिक्षण घेतलेले साधक आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांनी सर्व साधकांना निष्काम भावनेने सेवा आणि साधना करायला शिकवले आहे. सर्व साधक सर्व प्रकारची सेवा करतात. परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वागतकक्षात सेवा करणार्‍या साधिकेला अध्यात्मप्रचाराचे कार्य करायला शिकवले आणि त्यांच्या कृपेने आता ती साधिका महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांत अध्यात्मप्रचाराची सेवा करत आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वयंपाकघरात सेवा करणार्‍या साधिकेला विविध ठिकाणांहून रामनाथी आश्रमात येणार्‍या साधकांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकवण्यास सांगितले. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने ‘साधक त्याच्या क्षेत्राशी संबंधित नसलेली कोणत्याही प्रकारची सेवा करू शकतात’, हे परात्पर गुरु डॉक्टरांचे एक वैशिष्ट्य आहे.

– सौ. श्रद्धा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१.२०२४)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक