भगवंत आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे, तसेच आनंदी अन् सहजावस्थेत रहाणारे पू. राजाराम नरुटे (वय ९१ वर्षे) !
‘२.४.२०२४ या दिवशी मला पू. नरुटेआजोबांचा सत्संग लाभला. ‘वयस्कर आणि ग्रामीण भागात राहून एकलव्यासारखी साधना करणारे पू. नरुटेआजोबा हे ‘वयस्कर साधकांसाठी मार्गदर्शक आहेत’, असे मला वाटते. पू. आजोबांकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. परिस्थिती स्वीकारून ‘देव ठेवेल’, तसे रहावे !
मी पू. नरुटेआजोबांना विचारले, ‘‘तुम्हाला व्यावहारिक, कौटुंबिक, शारीरिक किंवा इतर अडचणी आल्यावर तुम्ही काय करता ?’’ ते मला म्हणाले, ‘‘देव ठेवेल तसे माणसाने रहावे.’’ म्हणजे संत तुकाराम महाराज यांच्या अभंगानुसार ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे । चित्ती असो द्यावे समाधान ।।’, असे पू. आजोबांना म्हणायचे होते. ‘हे सुवचनच त्यांच्या आनंदी जीवनाचे रहस्य आहे’, असे मला वाटते.
२. कुणाकडून कशाचीही अपेक्षा नसणे
मी पू. नरुटेआजोबांना विचारले, ‘‘सध्या कुणी कुणाचे ऐकत नाही. अध्यात्म आणि साधना यांविषयी जवळच्या लोकांनाही रुची नसते, तर काय करायचे ?’’ ते म्हणाले, ‘‘आपण दुसर्यांना भक्ती करण्याविषयी सांगत रहायचे आणि आपल्याकडे वळवत रहायचे. हळूहळू ते आपले ऐकतील. आपण कुणाकडूनही अपेक्षा करायची नाही. आपण कुटुंबियांवर चांगले संस्कार केले, तर हळूहळू तेही भक्ती करतील. आपण मात्र देव ठेवील, तसे रहायचे.’’
३. साधनेच्या मूळ तत्त्वाला धरून रहाणे
मी पू. आजोबांना साधनेविषयी विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘माझे नामस्मरण (आतून) चालू आहे. माझ्यात आत्मा आहे आणि तोच परमात्मा आहे. माझ्या शरिराची सेवा म्हणजे आत्म्याची सेवा आहे. ‘सर्वत्र परमात्मा आहे’, हे ध्यानात ठेवून वागायचे आणि आनंदात रहायचे.’’ यावरून पू. आजोबांची मूळ परमात्मा तत्त्वावर श्रद्धा आहे. त्यामुळे ‘ते स्थळ, काळ आणि व्यक्ती यांवर अवलंबून न रहाता एकलव्याप्रमाणे साधना करून संतपदी आरूढ झाले आहेत’, असे मला वाटले.
४. संत असूनही समष्टीला शिकवण्यासाठी पूजापाठासारखे कर्मकांड आवडीने करणे
मी पू. आजोबांना विचारले, ‘‘तुम्ही संतपदाला पोचले आहात, तरीही पूजाअर्चा करणे आणि देवाला फुले वाहणे, हे तुम्ही कशासाठी करता ?’’ त्यावर ते मला म्हणाले, ‘‘आपण केले, तर आपली मुले आणि समाज पूजाअर्चा करील.’’ म्हणजे ‘समष्टीला शिकण्यासाठी आपण कर्मकांडही भावपूर्णपणे करायला हवे’, असे पू. आजोबांना वाटते. यावरून ‘ते उतारवयातही धर्माचरणाची कृती स्वतःच्या आचरणातून शिकवतात’, असे मला वाटते.
५. जीवनातील कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी मन स्थिर रहाणे आवश्यक असणे
मी पू. आजोबांना विचारले, ‘‘आजारी पडणे, ‘आपल्याला कुणी विचारत नाही’, असे वाटणे, ‘माझे कुणी ऐकत नाही’, याचे दुःख होणे, मृत्यूची भीती वाटणे, यांविषयी तुम्हाला काय वाटते ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘मन मुंडा, तर सद्गुरु पाय धुंडा.’’ म्हणजे आपले मन स्थिर असेल, तर आपल्याला सद्गुरूंचे चरण मिळतात. मग आपल्याला कशाचीच भीती, काळजी आणि त्रास वाटायला नको.’’ ‘मन स्थिर ठेवणे, म्हणजे साधना करून आपले स्वतःचे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून गुणवृद्धी करणे’, असे पू. आजोबांना सांगायचे होते. यावरून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली स्वभावदोष आणि अहं निर्मूलन अन् गुणवृद्धी या प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित होते.
६. स्वावलंबी असणे आणि देवावर श्रद्धा असणे
पू. आजोबा उतारवयातही स्वतःचे सर्वकाही स्वतःच करतात. काठी घेऊन स्वतः एकटे खोलीबाहेर फिरायला जातात. ‘हातातील काठी मला चालवते’, असे ते सांगतात. तसेच ते ‘चल, पाय टाक’, असे देवाला सांगतात; कारण त्यांना या वयात चालणे कठीण होते. ‘देव मला शक्ती देतो, तो मला पाडत नाही. मला अलगद चालवतो’, अशी त्यांची श्रद्धा आहे.
७. देवावरील श्रद्धा आणि साधना यांच्या बळावर स्वभावदोषांचे निर्मूलन होणे
‘मनाच्या विरुद्ध झाल्यावर तुम्हाला कधी राग येतो का ?’, असे मी विचारल्यावर पू. आजोबा म्हणाले, ‘‘माझे मन स्थिर झाल्यामुळे माझा राग पळून गेला आहे. ‘कोणी वंदा कोणी निंदा । आम्हा स्वहिताचा धंदा ।।’’ यावरून पू. आजोबांनी राग येणे, प्रतिमा जपणे किंवा अपेक्षा करणे यांसारख्या अहंच्या पैलूंवर मात केली आहे.
८. सांप्रदायिक साधनेच्या चौकटीत न अडकता भक्ती करणे आणि ‘सर्व जण आपलेच आहेत’, असे वागणे
ते सांप्रदायिक साधना करत असूनही ‘माझेच तेवढे चांगले, मला अधिक येते, इतरांनी माझ्यासारखेच करावे’, असा त्यांचा अट्टहास नसतो. ‘वारकरी संप्रदाय आणि सनातन संस्था एकच आहेत, म्हणजे भगवंत किंवा ईश्वरी तत्त्व एकच असते’, असे त्यांना आतून वाटते. ‘भक्ती करणे हाच माणसाचा धर्म आहे’, याची त्यांना जाणीव आहे आणि त्याप्रमाणे ते कृती करत आहेत.
९. परात्पर गरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणे
पूर्वी पू. आजोबा संदिग्ध बोलायचे, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले भेटल्यावर मला आत्मज्ञान झाले आहे. त्यामुळे मी अध्यात्माविषयी सांगू शकतो.’’, अशी पू. आजोबांची श्रद्धा आहे. पूर्वी त्यांचे काही बोलणे मायेतील विषयांसंबंधी असायचे; पण आता ते सर्वकाही अध्यात्म आणि देव यांविषयीच बोलतात. ते म्हणतात, ‘‘मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या माध्यमातून देव भेटला. त्यामुळे मला देवाने कधीही नेले (देहत्याग झाला) तरी चालेल.’’ आता त्यांच्यामध्ये सकारात्मकता, स्थिरता आणि आनंदावस्था यांमध्ये वाढ झाली आहे. परात्पर गुरु डॉक्टरांना भेटल्यावर ‘देव पहावया गेलो आणि देव झालो’, अशी त्यांना अनुभूती आली आहे.
१०. स्वतःच्या कृतीतून अहंशून्यता, नम्रता आणि देवाप्रती भाव शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले अन् पू. नरुटेआजोबा !
वर्ष २०२२ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पू. नरुटेआजोबांचा संत सन्मान सोहळा झाला. त्यानंतर झालेल्या सत्संगाच्या वेळी पू. आजोबांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना नमस्कार केला. तेव्हा पू. आजोबांच्या आसंदीच्या जवळील आसंदीवर बसलेले परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘मला तुमच्यात पांडुरंग दिसत आहे. मला तुम्हाला नमस्कार करायचा आहे; पण मला वाकता येत नाही.’’ त्यावर पू. आजोबांनी त्यांचे चरण वर केले आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला. त्या वेळी परात्पर गुरु डाॅक्टर म्हणाले, ‘‘मला नमस्कार करता यावा; म्हणून पांडुरंगाने त्याचे चरण वर केले.’’ या प्रसंगातून मला पुढील गोष्टी शिकायला मिळाल्या.
अ. पू. नरुटेआजोबांनी ईश्वरेच्छा; म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांची पू. आजोबांच्या नमस्कार करण्याची इच्छा पूर्ण केली. तेव्हा पू. आजोबा यांना कसलाही संकोच वाटला नाही कि त्यांनी प्रतिमा जपली नाही. यावरून ‘ते एक सहजावस्थेतील संत आहेत’, असे मला वाटते.
आ. पू. आजोबा परात्पर गुरु डॉक्टरांपेक्षा वयाने मोठे आहेत. त्यांनी सांप्रदायिक मार्गानुसार साधना केली आहे, तरीही पू. आजोबांनी परात्पर गुरु डॉक्टरांचे नम्रतेने आणि भावपूर्ण दर्शन घेतले अन् त्यांच्याप्रती ‘गुरु’ असा भाव ठेवला.
इ. परात्पर गुरु डॉक्टरांना पू. आजोबांमध्ये पांडुरंग दिसला. त्यांनी पू. आजोबांच्या चरणांना हात लावून नमस्कार केला. यावरून परात्पर गुरु डॉक्टरांची पराकोटीची नम्रता आणि समाजातील संतांप्रतीचा उच्च कोटीचा भाव दिसून येतो.
ई. जेव्हा पू. आजोबांनी परात्पर गुरु डॉक्टरांना पाया पडण्यासाठी सोपे जावे; म्हणून स्वतःचे पाय वर केले, तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘प्रत्यक्ष पांडुरंगाने माझ्यासाठी त्याचे चरण वर केले.’’ प्रत्यक्षात त्या सत्संगात उपस्थित असलेल्या काही साधकांना ‘संकोचल्यासारखे आणि काहीतरी चुकीचे होत आहे’, असे वाटत होते; परंतु परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘नम्रता कशी असावी ? भाव कसा ठेवावा ? कोणत्याही प्रसंगात सकारात्मक कसे रहावे ?’, हे स्वतःच्या कृतीतून समाजाला शिकवले. जसे श्रीकृष्णाने अर्जुनाचे घोडे धुतले, उष्ट्या पत्रावळ्या उचलल्या, संत एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्या म्हणून चाकरी केली, तसेच परात्पर गुरु डॉक्टरांनी केले. जो भक्तांशी अहंशून्यतेने वागतो आणि भक्तांची सेवा करतो, तोच भगवंत होतो; म्हणून परात्पर गुरु डॉक्टर हे भगवंतच आहेत.
‘वयस्कर व्यक्तीही गुरुकृपेने योग्य वागून आणि साधना करून आनंदात राहू शकते अन् आध्यात्मिक प्रगती करू शकते’, हे मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि पू. नरुटेआजोबा यांनी शिकवले, त्यासाठी उभयतांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (पू.) श्री. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.४.२०२४)
|