मुळगाव (खेड) येथे वीजचोरी प्रकरणी महावितरणची कारवाई
रत्नागिरी जिल्ह्यात २६ लाख २४ सहस्र २७० रुपयांची सर्वांत मोठी वीजचोरी उघड !
खेड – तालुक्यातील मुळगाव येथील जांभा दगडाच्या खाणीमध्ये वीज चोरी उघड झाली आहे. २६ लाख २४ सहस्र २७० रुपयांची वीज चोरी ठाणे येथील महावितरणच्या भरारी पथकाने धाड घालून उघड केली. या प्रकरणी मुळगाव येथील रामचंद्र भागोजी बुदर यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांना वीज चोरीची देयके भरणा करण्याकरता मुदत देण्यात आली आहे.
तालुक्यातील खाडीपट्टा भागांत मुळगाव गावाच्या डोंगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर जांभा दगडाच्या खाणी चालू करण्यात आल्या आहेत. यामध्ये रामचंद्र बुदर या खाणमालकाने महावितरणकडून देण्यात आलेल्या व्यावसायिक मीटरमध्ये छेडछाड करून मोठ्या प्रमाणावर वीज चोरी केली आहे, तसेच स्वतःच्या आर्थिक लाभासाठी जांभा दगड तोडण्यासाठी लागणारे यंत्रे वीज चोरी करून चालवण्यात आली आहेत. या प्रकाराची
गोपनीय माहिती महावितरणच्या ठाणे येथील भरारी पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी उपकार्यकारी अभियंता उपविभाग लोटे यांच्या समवेत ही कारवाई केली. या पथकाने मूळगाव येथील जांभा खाण येथे धाड घातली असता मोठ्या प्रमाणात वीज चोरी केल्याचे उघड झाले.
या कारवाईत रामचंद्र बाबूजी बुदर यांना सहस्रो युनिट चोरी करून वीज वापरल्याबद्दल २ देयके अदा करण्यात आली आहेत. यामध्ये १३ लाख ३४ सहस्र ३९०, तर दुसरे देयक १२ लाख ८९ सहस्र ८८० अशा प्रकारे २६ लाख २४ सहस्र २७० रुपयांचे वीज चोरी केल्याची देयके देण्यात आली आहेत, तसेच त्यांनी ही रक्कम लवकरात लवकर भरायची आहे महावितरणच्या ठाणे येथील भरारी पथकाने यासंदर्भात पंचनामा केला असून संबंधित खाण मालक रामचंद्र भागोजी बुदर यांच्यावर पुढील काही दिवसांत कायदेशीर कारवाईही करण्यात येणार आहे.
संपादकीय भूमिकारत्नागिरी जिल्ह्यामध्ये वीज चोरीचे प्रमाण शून्य टक्के असल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भाग वीज भारनियमनापासून (लोड शेडिंगपासून) वगळण्यात आला आहे. आता मात्र सर्वांत मोठी वीजचोरी झाल्याने जिल्ह्यालाच कलंक लागला आहे. अशी वीज चोरी करणार्यांवर कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |