Jaishankar On POK : योग्य वेळ आल्यावर पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग बनणार !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे रोखठोक वक्तव्य !

नवी देहली – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत पाकव्याप्त काश्मीरविषयी रोखठोक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, योग्य वेळ येताच पाकव्याप्त काश्मीरवर निर्णय होईल. ‘पाकव्याप्त काश्मीर परत येणार’, असे संपूर्ण देशाला वाटते. ‘काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात येईल, हे देशात कुणाला वाटले होते का ?’ असा प्रश्‍न करत त्यांनी केंद्रशासनाचे पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात निश्‍चित धोरण आहे, याचे सुतोवाच केले. ‘पाकव्याप्त काश्मीर हे भारताचे आहे आणि आम्ही ते घेणारच’, असे डॉ. जयशंकर यांनी ठणकावत सांगितले.

जयशंकर पुढे म्हणाले की,

१. वर्ष १९४९ मध्ये पंतप्रधान नेहरूंमुळे काश्मीरचा काही भाग पाकिस्तानने कह्यात घेतला. तेथील काही भूमी पाकिस्तानने चीनला दिली. नेहरूंच्या काळातील चुकीचा दोष पंतप्रधान मोदी यांना का ?

२. कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरचे भविष्य पालटले. पाकव्याप्त काश्मीर हाही भारताचा अविभाज्य भाग आहे. कुणाच्या तरी चुकीमुळे तो देशापासून तुटले; पण योग्य वेळ येताच या प्रश्‍नाचा निकाल लागेलच !

३. पाकव्याप्त काश्मीर निश्‍चितपणे भारतात येईल; परंतु प्रत्येक गोष्टीला एक वेळ येऊ द्यावी लागते. आपल्यालाही सिद्धता करावी लागेल.

४. कोणत्याही पूर्व सिद्धताखेरीज मोठे पाऊल टाकल्यास काय होते, हे सर्वांना ठाऊक आहे. त्यात मोठा धोका असतो. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटणार हे कुणाला वाटले होते का ? पण किती सोप्या पद्धतीने सर्व गोष्टी झाल्या. त्यासाठी आम्ही अगोदर सिद्धता केली नाही का ? विकासावर लक्ष केंद्रित केले, एक प्रारूप सिद्ध केले. त्याचा लागलीच परिणाम दिसला.

पुढील ६ महिन्यांत पाकव्याप्त काश्मीर हा भारताला पुन्हा जोडला जाईल ! – योगी आदित्यनाथ

निवडणुकीच्या एका प्रचारसभेत उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतेच पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात मोठे वक्तव्य केले. ‘निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान होतील. त्याच्या पुढील ६ महिन्यांतच पाकव्याप्त काश्मीर हा भारताला पुन्हा जोडला जाईल’, असे त्यांनी म्हटले होते.