सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संकल्पाने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या अंतर्गत चालू केलेल्या ‘संगीताच्या माध्यमातून साधना’, याविषयी उत्तरोत्तर वाढत गेलेले कार्य !
वर्ष २०१७ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या वेळी त्यांनी ‘आज महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या अंतर्गत संगीताच्या (टीप १) माध्यमातून साधना करण्यासाठी ‘संगीताशी संबंधित कार्य चालू केले आहे’, असे सांगितले होते. त्यांच्या या संकल्पामुळेच ते कार्य अल्पावधीतच वाढत गेले आणि प्रतिदिन ते वाढतच आहे.
(टीप १- या लेखात जिथे जिथे ‘संगीत’ असा उल्लेख केला आहे, त्यात गायन, वादन, नृत्य, नाट्य अशा चौघांचा समावेश आहे.)
१. संगीताचे कार्य चालू केल्यावर आरंभीच्या काळात केलेल्या सेवा
अगदी आरंभीच्या काळात संगीताशी संबंधित सेवा करणार्या साधकांनी संगीताविषयीचे ग्रंथ वाचून अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूत्रांवर खुणा करण्याची सेवा केली. यानंतर संगीतातील संशोधनात्मक विविध प्रयोगांचा आरंभ झाला. त्यानंतर बाहेर जाऊन प्रथितयश कलाकारांना संपर्क करून त्यांच्या भेटी घेतल्या.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या बोलण्याची आलेली प्रचीती !
पूर्वी एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले मला म्हणाले होते, ‘‘आपल्याला कलाकारांना कलेतून साधनेचा मार्ग दाखवायचा आहे. त्यासाठी आता तुला संपर्काला जावे लागत आहे. पुढे तुला या कार्यासाठी विदेशातही जावे लागेल; पण नंतर कलाकारच आपल्याकडे येतील. तुला कुठे जायची आवश्यकताच रहाणार नाही. पुढे आपल्याला संगीत विषयासंबंधी अधिवेशनही घ्यावे लागेल.’’ गुरुदेवांच्या या वाक्यांचा आता प्रत्यय येत आहे.
अ. आता बरेच कलाकार स्वतःहून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला भेट देत आहेत. आम्हाला त्यांच्याकडून कलाक्षेत्रातील विविध गोष्टी शिकताही येत आहेत.
आ. संगीताशी संबंधित कलाकार आणि विद्यार्थी यांचे शिबिर झाले. त्या शिबिरात आलेल्यांसाठी आता ‘साधना सत्संग’ चालू झाला आहे.
इ. आता जानेवारी २०२५ मध्ये अमेरिकेतील ‘सुरभी ग्रुप’ हा महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात येणार आहे. या गटामध्ये भारतीय आणि विदेशी मिळून १० हून अधिक संगीत कलाकार आहेत.
त्यामुळे आता केवळ भारतीय कलाकारच नाही, तर विदेशी कलाकारही महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संगीतातील संशोधनकार्य पहाणार असून त्यात सहभागी होणार आहेत. अर्थात् हे सर्व गुरुदेवांचा संकल्प आणि कृपा यांमुळेच होत आहे.
३. संगीताशी संबंधित चालू असलेल्या या कार्याचा आढावा
वर्ष २०१७ ते वर्ष २०२३ या ६ वर्षांमध्ये संगीताशी संबंधित झालेल्या कार्याचा आढावा मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण करत आहे.
(टीप २- दोन किंवा अधिक संगीत प्रकारांचे एकत्रीकरण केल्यावर त्यातून निर्माण झालेल्या नवीन अविष्काराला ‘फ्यूजन’ संगीत म्हणतात.)
(टीप ३ – एक कलाकार एका जन्मात साधारणतः अधिकाधिक ४० ते ६० वर्षे कलेला देऊ शकतो. कलेचा अथांग सागर एकट्याने अभ्यासायला आणि अनुभवायला एक जन्म अपुरा आहे. स्वतः एकट्याने जीवनभर संगीतातून साधना केली, तरी थोड्याच गोष्टी अनुभवता येतील; पण ४० – ५० वर्षे कलेसाठी वाहिलेल्या अनेक कलाकारांच्या भेटी घेतल्यामुळे ‘त्यांचा कलेकडे पहाण्याचा दृष्टीकोन, त्यांनी केलेला कलेचा अभ्यास, त्यांचे अनुभव आणि अनुभूती’, अशा अनेक गोष्टी आम्हाला शिकता आल्या.)
(टीप ४ – साधकाची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होते; म्हणजे त्याच्यातील सात्त्विकता ६१ टक्के होते आणि तो जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होतो.)
४. प्रस्तावित कार्य
अ. संगीतातून साधना आणि संशोधन या विषयांवर विविध ग्रंथ प्रकाशित करणे
आ. संगीताविषयी केलेल्या संशोधनाचे कार्य ‘संकेतस्थळा’च्या माध्यमातून समाजापर्यंत पोचवणे
इ. ‘संगीतातून साधना’ विषयावरील विविध चर्चासत्रे आयोजित करणे
ई. ‘संगीतातून साधना’ याविषयी घेतल्या जाणार्या शिबिरांची संख्या वाढवणे आणि त्यासाठी विविध जिल्ह्यांतही हा उपक्रम घेणे
उ. शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये ‘संगीत-नृत्य-नाट्य यांवरील संशोधन अन् साधना’ या विषयांचे अभ्यासक्रम चालू करण्यासाठी प्रयत्न करणे
ऊ. संगीताचे अधिवेशन घेणे.
५. अनुभूती
५ अ. संगीतातील पुढचे पुढचे कार्य केवळ ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संकल्पानेच होत आहे’, असे सातत्याने अनुभवता येणे : ‘संगीताचे हे कार्य गुरुदेवांच्या आशीर्वादानेच चालू झाले आणि त्यांच्याच इच्छेने होत आहे’, असे आम्हाला सातत्याने अनुभवता येत आहे; कारण आम्ही यातील कुठलाही उपक्रम बुद्धीने विचार करून ठरवून चालू केला नाही. एका नंतर एक असे पुढच्या पुढच्या टप्प्याचे कार्य गुरुदेवांच्या संकल्पामुळे आपोआप होत आहे. हे सातत्याने अनुभवल्यामुळे ‘गुरुदेव आता कुठले नवीन कार्य करून घेणार आहेत ?’, याची आम्ही साधक उत्सुकतेने वाट पहात असतो.
५ आ. ‘संगीतातील पुढच्या पुढच्या टप्प्याचे कार्य करण्याविषयी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेच आतून सुचवत आहेत’, हे लक्षात येणे : पूर्वी एकदा गुरुदेव म्हणाले होते, ‘तेजलला स्थुलातून संगीताच्या कार्याविषयी मार्गदर्शन करणारे कुणी नाही. देवच तिला आतून सुचवतो आणि ती त्याप्रमाणे करते.’ गुरुदेवांचे हे वाक्य आणि वरील अनुभूती यांतून ‘गुरुदेवच मला आतून सूचवून आमच्याकडून ही सेवा करून घेत आहेत’, हे शिकता आले.
‘या ईश्वरी कार्यासाठी गुरुदेवांनी आमची निवड केली’, यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. ‘गुरुदेव, आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपणच आमच्याकडून आपल्या चरणांची सेवा अविरत करून घ्यावी’, अशी आपल्या पावन चरणी प्रार्थना आहे.’
– सुश्री तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, संगीत विशारद आणि संगीत समन्वयक), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.(९.५.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |