पुणे येथील बांधकाम व्यावसायिक राम नदीत सांडपाणी सोडत असल्याचा ‘आप’चा आरोप !
पुणे – येथील बावधन खुर्द येथील एका सोसायटीतून प्रतिदिन १० ते १२ टँकर सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना थेट राम नदीत सोडले जाते. या सोसायटीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एस्.टी.पी.) बंद पडला असून बांधकाम व्यावसायिकाकडूनच हे पाणी नदीत सोडले जात असल्याचा आरोप करत हे न थांबवल्यास आंदोलन करण्याची चेतावणी आम आदमी पक्षाने (आपने) दिली आहे. आपचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, ‘पर्यावरण सेल’चे कुणाल घारे, किरण कद्रे यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली, तसेच या वेळी महापालिका राबवत असलेल्या ‘जायका प्रकल्पा’विषयी श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही करण्यात आली आहे. (स्थानिक प्रशासनाला हे दिसत नाही का ? अन्य पक्षांना अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)
राम नदीच्या प्रदूषणाच्या संदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एन्.जी.टी.) सुनावणी चालू आहे. यामध्ये पुणे जिल्हा परिषद, पुणे महापालिका, पुणे महानगर विकास प्राधिकरण (पी.एम्.आर्.डी.ए.) यांच्या विरोधात हा दावा प्रविष्ट आहे. राम नदी परिसरात झालेल्या मोठ्या गृहप्रकल्पांत निर्माण होणारे सांडपाणी सोडले जात असल्याच्या तक्रारीवर ही सुनावणी चालू आहे. राम नदी पूर्ववत् करावी, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे.