बनावट हलाल प्रमाणपत्र देणार्या ‘हलाल काऊन्सिल ऑफ इंडिया’च्या ४ आरोपींना अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून जामीन संमत !
प्रयागराज – अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘हलाल काऊन्सिल ऑफ इंडिया’ या संघटनेच्या ४ पदाधिकार्यांना जामीन संमत केला आहे. यामध्ये ‘हलाल काऊन्सिल ऑफ इंडिया’चे अध्यक्ष हबीब युसुफ पटेल, उपाध्यक्ष मुईदशिर सपाडिया, महासचिव महंमद ताहिर आणि कोषाध्यक्ष महंमद अन्वर यांचा समावेश आहे. या सर्वांवर बनावट हलाल प्रमाणपत्र देऊन धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात आरोप करण्यात आला आहे की, आरोपींनी केवळ खाद्यपदार्थांच्या संदर्भातच नव्हे, तर सौंदर्यप्रसाधने, मध, शाकाहारी उत्पादने आदी वस्तूंसाठीही ‘हलाल प्रमाणपत्र’ दिले होते. दोन समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्यासाठी ही कृत्ये केली जात होती आणि त्यातून मिळणारा पैसा आतंकवादाशी संबंधित कारवायांमध्ये वापरला जात असल्याचा युक्तीवादही करण्यात आला होता. आरोपींना १३ फेब्रुवारी २०२४ या दिवशी अटक करण्यात आली होती. दुसरीकडे सरकारी अधिवक्त्यांनी जामीन अर्जाला विरोध केला आणि या संघटनेने अधिकार नसतांना प्रमाणपत्र देऊन आर्थिक समतोल बिघडवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला.