वानवडी (पुणे) येथे भरदिवसा पेढीवर दरोडा !
पुणे – वानवडी परिसरातील बी.जी.एस्. ज्वेलर्स या सराफी पेढीवर भरदिवसा ६ ते ७ जणांनी दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. ही घटना १८ मे या दिवशी दुपारी १२ वाजता घडली. ही संपूर्ण घटना सी.सी.टी.व्ही. कॅमेर्यामध्ये चित्रीत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, तसेच स्थानिक पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली. या दरोड्याची नोंद वानवडी पोलीस ठाण्यात झाली असून आरोपींच्या शोधासाठी पथके पाठवण्यात आली आहेत.
वानवडी परिसरातील महंमदवाडी रस्त्यावरील वारकर मळा येथे बी.जी.एस्.ज्वेलर्स नावाची पेढी आहे. दुपारी १२ वाजता तोंडाला कापड बांधून आलेल्या दरोडेखोरांनी ३०० ते ४०० ग्रॅम वजनाचे सोने चोरून नेले. दरोडेखोर हे दुचाकी गाडीवरून पसार झाले. दरोडेखोरांनी पेढीचे मालक आणि कामगार यांना शस्त्राचा धाक दाखवला. जिवे मारण्याची धमकी देत पेढीतील सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली.
संपादकीय भूमिका :गुन्हेगार भरदिवसा दरोडा टाकतात म्हणजे पोलिसांचा धाक संपल्याचे लक्षण ! अशी पोलीसयंत्रणा कायदा-सुव्यवस्थेची स्थिती कशी सुधारणार ? |