‘त्रिकोण’ आणि ‘चौकोन’ या दोन शब्दांत ‘कोन’ हाच सामायिक शब्द असूनही पहिल्या शब्दाच्या शेवटी ‘ण’ आणि दुसर्या शब्दाच्या शेवटी ‘न’ येत असणे
१. मराठी ‘कोन’ हा शब्द संस्कृत ‘कोण’ या शब्दापासून निर्माण झाला असणे : मराठी भाषेतील ‘कोन’ हा शब्द संस्कृत भाषेमधील ‘कोण’ या शब्दापासून निर्माण झाला आहे. संस्कृतमध्ये ‘त्रिकोण’, ‘चतुष्कोण’, ‘षट्कोण’ असे शब्द आढळतात. ‘या शब्दांच्या अंती ‘ण’ हे अक्षरच का लिहावे ?’, याविषयी संस्कृत भाषेमध्ये निश्चित नियम आहेत. हे नियम महर्षि पाणिनी यांनी सिद्ध केले आहेत.
२. मराठीने संस्कृतमधून केवळ शब्द घेतले असणे, शब्दांचे नियम घेतले नसणे : मराठी भाषेने अनेक शब्द संस्कृतमधून घेतले; पण महर्षि पाणिनी यांनी सांगितलेले त्या सर्व शब्दांमागील नियम मात्र घेतले नाहीत. त्यामुळे मराठी भाषेतील अनेक संस्कृत शब्द कोणत्याही नियमांविना केवळ रूढ बोली भाषेच्या आधारे विकसित होत गेले. ‘जे शब्द संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीत आले, त्यांना ‘तत्सम’ शब्द म्हणावे आणि जे शब्द संस्कृतमधून थोडाफार पालट होऊन मराठीत आले, त्यांना ‘तद्भव’ शब्द म्हणावे’, अशी व्यवस्था मराठी व्याकरणाने स्वीकारली.
३. मराठी भाषेत ‘कोण’ आणि ‘कोन’ हे दोन्ही शब्द रूढ असणे : संस्कृत भाषेतील ‘कोण’ हा शब्द मराठीत येतांना ‘कोण’ आणि ‘कोन’ अशा दोन्ही रूपांमध्ये आला. ‘तो तसा का आला ?’, याचा कोणताही निश्चित नियम मराठीमध्ये नाही. भाषेतील काही शब्दांमध्ये मराठीने ‘कोण’ या शब्दाचा वापर केला, तर काही शब्दांमध्ये ‘कोन’ हा शब्द वापरला. त्यामुळे ‘त्रिकोण’ आणि ‘चौकोन’ असे अंती अनुक्रमे ‘ण’ अन् ‘न’ असलेले शब्द सिद्ध झाले.
४. ज्या शब्दांमध्ये ‘कोण’ हा शब्द वापरला गेला, त्यांना ‘तत्सम’ शब्द म्हटले गेले आणि ज्यांत ‘कोन’ हा शब्द वापरला गेला, त्यांना ‘तद्भव’ शब्द म्हटले गेले.
अशा प्रकारे ‘त्रिकोण’ या शब्दाच्या अंती ‘ण’ हे अक्षर आणि ‘चौकोन’ या शब्दाच्या अंती ‘न’ हे अक्षर लिहिण्याची रीत मराठी भाषेत रूढ झाली. (८.५.२०२४)
– सुश्री सुप्रिया शरद नवरंगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.