डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे भांडवल केले गेले का ?
बहुचर्चित डॉ. दाभोलकर हत्याकांडाचा निकाल अखेर लागला. यामध्ये २ आरोपींना जन्मठेपेसह ५ लाख रुपये दंडाची शिक्षा झाली, तर तिघांना पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले. या निकालाविषयी दोन्ही पक्षांनी समाधान व्यक्त केले असले, तरी दोन्ही पक्ष पुढील न्यायालयात दाद मागण्यासाठी जाणार आहेत. या सर्वांत अधिक चर्चा झाली ती तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या वादग्रस्त विधानाची ! पुण्यातून दाभोलकरांच्या हत्येची बातमी कानी येताच काही मिनिटांच्या आत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी (काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी) कोल्हापुरात माध्यमांसमोर ‘या खुनामागे गोडसेवादी विचारसरणीचा हात आहे’, असे विधान केले. यातून अन्वेषण कोणत्या दिशेने करायला हवे ? याचा मार्गच तपास यंत्रणांना जणू दाखवून दिला. मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर दाभोलकर परिवारानेही यावर ‘री’ ओढली. परिणामी या अन्वेषणात पुढे हिंदुत्वनिष्ठ संघटनांना गोवण्याचा प्रयत्न झाला, संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या चौकशा करण्यात आल्या. त्यांच्या कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्या. ज्यामध्ये ‘सनातन संस्थे’चे नाव सर्वांत पुढे आले.
१. तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे महत्त्वाच्या गुन्ह्यातील अन्वेषणाची दिशा भरकटली !
‘डॉ. दाभोलकर आणि सनातन यांचे वैचारिक मतभेद होते’, यातूनच ही हत्या झाल्याचे कारण अन्वेषण यंत्रणांनी समोर केले अन् त्या दिशेने तपास झाल्याचे मत सनातन संस्थेने पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केले आहे. दाभोलकरांच्या हत्या प्रकरणात तपास एकांगी झाल्यानेच आज सत्य समोर येऊन सनातनच्या एका साधकासह अन्य २ हिंदुत्वनिष्ठांची मुक्तता झाली आणि खरे मारेकरी अन्वेषण यंत्रणांपासून दूरच राहिले. दाभोलकरांच्या रूपाने एक विज्ञानवादी विचारवंत समाजाने गमावला आहे. दाभोलकर परिवारावर त्या वेळी दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यामुळे आज ११ वर्षांनंतर आलेल्या निकालानंतरही सामाजिक भावना दाभोलकर परिवाराच्या बाजूने आहेत; मात्र एवढ्या प्रतिष्ठित व्यक्तीमत्त्वाच्या हत्येचे अन्वेषण चुकीच्या दिशेने केल्याचे दुःख समाजालासुद्धा आहेच. या निकालानंतर माजी मुख्यमंत्र्यांना त्यांनी केलेल्या वक्तव्याविषयी माध्यमांनी विचारणा केली असता त्यांनी ‘मी आजही स्वतःच्या वक्तव्यावर ठाम आहे’, असे सांगितले, याचे खरे तर आश्चर्य वाटते; कारण त्यांच्या विधानामुळे एका महत्त्वाच्या गुन्ह्यातील अन्वेषणाची दिशा भरकटली.
२. सनातन संस्थेने पत्रकार परिषदेत केलेले आरोप
डॉ. दाभोलकर हत्येचा निकाल आल्यानंतर सनातन संस्थेने पत्रकार परिषद घेऊन न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले आणि काही प्रश्न उपस्थित करतांना फिर्यादी पक्षावर (दाभोलकर कुटुंबीय आणि अन्वेषण यंत्रणा यांच्यावर) आरोपही केले, ‘ज्याची उत्तरे समाजाला मिळायला हवीत’, अशी मागणी त्यांनी केली.
अ. दाभोलकरांची हत्या झाली, त्याच दिवशी मुंब्रा येथून शस्त्रतस्कर मनीष खंडेलवाल आणि विकास नागोरी या दोघांना एका खंडणीच्या प्रकरणात अटक करण्यात आली. त्यांच्याकडे जे पिस्तूल सापडले, त्याच पिस्तुलातून डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे ‘बॅलेस्टिक’ अहवालातून स्पष्ट झाले होते. असे असतांना त्या दिशेने अन्वेषण का झाले नाही ?
आ. या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक झाल्यानंतर ‘डॉ. तावडे हेच या हत्या प्रकरणात ‘मास्टरमाईंड’ (मुख्य सूत्रधार) आहेत’, असा प्रचार दाभोलकर परिवारासह अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला. त्यांनी सनातन संस्थेचे साधक अकोलकर आणि पवार यांची छायाचित्रे असलेले भित्तीपत्रक ठिकठिकाणी लावले, ज्यावर ‘डॉ. तावडे यांच्या सांगण्यानुसार सनातन संस्थेचे अकोलकर अन् पवार यांनी डॉ. दाभोलकरांची हत्या केली’, असे लिखाण करण्यात आले होते. आज डॉ. तावडे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे आणि सचिन अंदुरे अन् शरद कळसकर यांनी गुन्ह्याची संमती दिली आहे, मग सनातनविरोधी भित्तीपत्रके लावून दाभोलकर परिवार आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी जाणीवपूर्वक सनातन संस्थेची अपकीर्ती का केली ?
इ. डॉ. तावडे यांना अटक झाल्यावर तेच या हत्येचे ‘मास्टरमाईंड’ असल्याचा प्रचार करणारा दाभोलकर परिवार गेल्या काही वर्षांपासून हत्येमागील ‘मास्टरमाईंड’ अद्याप बाहेर असल्याचा प्रचार करत आहे. सीबीआयने तिचे अन्वेषण पूर्ण करून आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) केल्यानंतरही ‘हत्येमागील ‘मास्टरमाईंड’ पकडला गेला नाही’, हे एकच कारण सांगत ‘मागील ८ वर्षांपासून सुनावणी थांबवून ठेवली’, असा आरोपही या प्रकरणातील आरोपीच्या अधिवक्त्यांकडून केला गेला. ‘या हत्येचे अन्वेषण जलदगतीने करण्याची मागणी आरोपींकडून केली जात होती आणि दाभोलकर परिवार यामध्ये वेळकाढूपणा करत होता’, असेही अधिवक्त्यांनी या वेळी सांगितले.
ई. याखेरीज न्यायालयात सादर करण्यात आलेल्या एका साक्षीदाराची दाभोलकर परिवाराने घरी जाऊन भेट घेतली. सुनावणीच्या वेळी ‘साक्षीदार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांसह जेवायला बसत’, असे गंभीर आरोपही या पत्रकार परिषदेतून करण्यात आले.
उ. डॉ. तावडे यांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी ज्या साक्षीदाराला उभे करण्यात आले होते, त्या साक्षीदारावर कोल्हापूरमधील श्री महालक्ष्मी मंदिरातील ६०० किलो चांदीचा अपहार केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण डॉ. तावडे यांनीच हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत कार्य करतांना उजेडात आणले होते. हे पुढे न्यायालयातही सिद्ध झाले.
ऊ. सनातन संस्थेच्या विक्रम भावे यांना डॉ. दाभोलकरांच्या हत्येआधी घटनास्थळाची रेकी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती; मात्र हा आरोपही न्यायालयात सिद्ध होऊ शकला नाही.
ए. याच प्रकरणात वापरण्यात आलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिल्याचा आरोप करण्यात आलेले अधिवक्ता संजीव पुनाळेकर हे हिंदुत्वनिष्ठांचे खटले लढतात; म्हणूनच त्यांना गोवण्यात आल्याचा आरोप सनातन संस्थेने या वेळी केला. पुनाळेकर यांच्यावर लावलेले आरोपही न्यायालयात सिद्ध होऊ शकले नाहीत. ‘विक्रम भावे हे पुनाळेकर यांना त्यांच्या कामात साहाय्य करत असल्याने त्यांनी पुनाळेकर यांच्या विरोधात खोटी साक्ष द्यावी’, यासाठी अन्वेषण अधिकार्यांनी भावे यांच्यावर दबाव टाकण्यात आल्याचेही भावे यांनी स्पष्ट केले आहे.
३. सनातन संस्थेची अपकीर्ती कोण भरून काढणार ?
एका सामाजिक विचारवंताचा दिवसाढवळ्या खून होतो, हे सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे; मात्र त्या घटनेचे भांडवल करून प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांकडून राजकीय स्वार्थासाठी अन्वेषणाची दिशा भरकटवली जाणे, हिंदुत्वनिष्ठ संघटनांना ‘टार्गेट’ (लक्ष्य) करणे, त्यांची अपकीर्ती करणे, चौकशीच्या नावाने संघटनेच्या कार्यकर्त्यांचा छळ करणे, त्यांच्यावर आतंकवादाचे आरोप करणे, ‘भगवा आतंकवादा’ची दवंडी पिटणे, अन्वेषणात वेळकाढूपणा करणे, खोटे साक्षीदार उभे करणे हे सर्व अत्यंत गंभीर आहे. एखादी संघटना नावारूपाला येण्यासाठी त्या संघटनेतील सक्रीय कार्यकर्त्यांना भरपूर परिश्रम घ्यावे लागतात; मात्र अशा काही प्रकरणामध्ये जेव्हा त्या संघटनेचे नाव घेतले जाते, तेव्हा हे सारे परिश्रम मातीमोल ठरतात. कालांतराने तिचे निर्दोषत्व जरी सिद्ध झाले, तरी त्या संघटनेची झालेली अपकीर्ती ही कधीच भरून काढता येत नाही. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातही हेच झाले आहे. सनातन संस्थेचे निर्दाेषत्व आज जरी सिद्ध झाले असले, तरी या संपूर्ण प्रकरणात संस्थेची झालेली अपकीर्ती कशी आणि कोण भरून काढणार ? असा प्रश्न यानिमित्ताने सनातन संस्थेने उपस्थित केला आहे.
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.
शहरी नक्षलवादाची पाळेमुळे खणून काढणार का ?या सर्वांमागे ‘शहरी नक्षलवादा’चा हात असण्याची शक्यता सनातन संस्थेच्या प्रवक्त्यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे येणार्या काळात शहरी नक्षलवादाची पाळेमुळे खणून काढण्याचे मोठे आव्हान अन्वेषण यंत्रणांसमोर असणार आहे. – श्री. जगन घाणेकर |