Yogi Adityanath Pakistan : पाकिस्तानचे समर्थन करणार्‍यांनी पाकिस्तानात जावे !

धुळ्यातील प्रचारसभेत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना सुनावले !

धुळे – आज जगभरात भारताचा सन्मान वाढला आहे. देशात काँग्रेस सरकारच्या काळात वारंवार बाँबस्फोट घडत होते; मात्र आता मोदी सरकारने अशा घटना रोखल्या आहेत; मात्र काँग्रेसच्या वतीने पाकिस्तानचे समर्थन केले जात आहे. पाकिस्तानचे समर्थन करणार्‍यांनी पाकिस्तानात जावे. भारताचे खाऊन पाकिस्तानचे गुणगान गाणार्‍यांना भारतात स्थान नाही, अशी चेतावणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे १८ मे या दिवशी धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत दिली.

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, ‘अबकी बार ४०० पार’ची घोषणा दिली की, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकते; मात्र तुम्ही कोणतीही शंका मनात ठेऊ नका. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार आहे.’ मालेगाव आणि धुळे येथील बांधवांनी अयोध्या येथे श्रीराममंदिराच्या दर्शनासाठी यावे, असे आमंत्रणही त्यांनी या वेळी दिले. श्रीराममंदिराच्या उभारणीत महाराष्ट्रातील सहस्रो कारसेवकांचे योगदान आहे. ‘अयोध्या येथील श्रीराममंदिराच्या संदर्भात न्यायालयाचा निकाल आल्यानंतर देशात दंगली होतील’, असे काँग्रेस सरकार म्हणत होते; मात्र आता हा नवीन भारत आहे. श्रीराममंदिराचा निकालही लागला आणि श्रीराममंदिरही उभे राहिले, असे म्हणत योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर टीका केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘काँग्रेसचे सरकार आल्यानंतर अयोध्या येथील श्रीराममंदिर आम्ही धुऊन स्वच्छ करणार’, असा दावा केला होता. याचा समाचार घेतांना योगी आदित्यनाथ म्हणाले की, नाना पटोले अयोध्येपर्यंत पोचतील, एवढी त्यांची ताकद रहाणार नाही. अयोध्येतील श्रीराममंदिर हे १४० कोटी नागरिकांच्या आस्थेचे प्रतीक आहे.