पाटलीपुत्र (बिहार) येथे मुख्याध्यापिकेने ४ वर्षीय घायाळ मुलाला गटारात फेकल्याने त्याचा मृत्यू !

पाटलीपुत्र (बिहार) – येथील ‘टिनी टॉट अकादमी’ या शाळेत नर्सरीचे शिक्षण घेणार्‍या ४ वर्षीय आयुषच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शाळेचा संचालक असलेल्या त्यांच्या मुलाला अटक केली आहे.

पोलिसांच्या चौकशीत मुख्याध्यापिका वीणा झा उपाख्य पुतुल झा यांनी सांगितले की, आयुष शाळेत खेळत असतांना खाली पडून बेशुद्ध झाला. त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. मुख्याध्यापिका म्हणाल्या, ‘‘आम्ही घाबरलो. मी माझा मुलगा धनराज झा (वय २१ वर्षे) याला सांगितले. आम्ही दोघांनी मिळून आधी रक्ताचे डाग पुसले आणि नंतर आयुषला गटारात फेकून दिले. आम्हाला वाटले कुणाला काही कळणार नाही.’’ दुसर्‍या दिवशी आयुषचा मृतदेह शाळेतील गटारात तरंगतांना आढळून आला.

आरोपींनी गुन्ह्यात सहभाग असल्याची स्वीकृती दिली ! – पोलीस

शहराचे पोलीस अधीक्षक चंद्र प्रकाश यांनी सांगितले की, आयुष खेळतांना घायाळ झाला. जास्त रक्तस्राव चालू झाल्यावर मुख्याध्यापिका आणि त्यांचा मुलगा हे दोघेही घाबरले. त्यांनी मुलाला दवाखान्यात नेले नाही, तर गटारात टाकले. हेच त्याच्या मृत्यूचे कारण ठरले. दोघांनीही गुन्ह्यात सहभाग असल्याची स्वीकृती दिली आहे.

जमावाने शाळा पेटवली !

मृतदेह सापडल्यानंतर संतप्त लोकांनी शाळेच्या पटांगणात तोडफोड केली आणि इमारतीला आग लावली. संतप्त कुटुंबियांनी मृतदेह रस्त्यावर ठेवत दानापूर-गांधी मैदान हा मुख्य रस्ता रोखून धरला. रस्त्यावर जाळपोळही करण्यात आली.

संपादकीय भूमिका

अशा हिंस्र वृत्तीच्या मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांवर कधी चांगले संस्कार करू शकतील का ? अशांवर कठोर कारवाई व्हायला हवी !