रत्नागिरी येथील सीए शाखेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
रत्नागिरी – द इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या रत्नागिरी शाखेमार्फत नुकतेच रत्नागिरीतील सीए करणार्या विद्यार्थ्यांकरता मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात मार्गदर्शन करण्याकरता पुणे सीए शाखेच्या अध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी उपस्थित होत्या. उज्ज्वला क्लासेसच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सीएच्या अभ्यासक्रमात अभ्यासाचे नियोजन करण्यास पुष्कळ महत्त्व आहे. दिवसाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन याचा मेळ कसा घालावा ? याविषयी सखोल मार्गदर्शन सीए अमृता कुलकर्णी यांनी या वेळी केले. अभ्यास करतांना एकाग्रता, मानसिक स्वास्थ्यसुद्धा आणि परीक्षेच्या कालावधीत पुष्कळ महत्त्वाचे असते. सीए अभ्यासक्रमातील विविध टप्प्यांवर अभ्यास करतांना लागणारे ज्ञान हे वेगवेगळे असते. अशा वेळी विविध विषयांचा अभ्यास करतांना परीक्षेच्या अनुषंगाने काय काळजी घ्यावी लागते ? याबद्दल सीए कुलकर्णी यांनी स्वतःच्या अनुभवातून आणि विविध उदाहरणांतून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सीए कुलकर्णी यांनी समर्पक उत्तरे दिली.
उज्ज्वला क्लासेसचे संचालक पुरुषोत्तम पाध्ये यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले. या वेळी रत्नागिरी सीए ब्रँच स्टुडन्ट असोसिएशनचे अध्यक्ष सीए अक्षय जोशी यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी व्यासपिठावर सीए ब्रँच रत्नागिरी उपाध्यक्ष सीए शैलेश हळबे, व्यवस्थापन समिती सदस्य प्रसाद आचरेकर उपस्थित होते. सीए शरद वझे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.