बुलडोझर कुठे चालवायचा हे योगी आदित्यनाथ यांच्याकडून शिकावे !  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधी पक्षांना ‘सल्ला’ !

बाराबंकी (उत्तरप्रदेश) – समाजवादी पक्ष आणि काँग्रेस केंद्रात सत्तेत आल्यास अयोध्येतील श्रीराममंदिरावर बुलडोझर चालवतील, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील प्रचारसभेत केला. ‘बुलडोझर कुठे चालवायचा हे शिकण्यासाठी या लोकांनी उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून शिकवणी घेतली पाहिजे’, असा टोला त्यांनी या पक्षांना लगावला.

मोदी यांनी मांडलेली सूत्रे

इंडी आघाडी अशांतता निर्माण करत आहे !

भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी देशाच्या भल्यासाठी काम करत आहे. तर ‘इंडी’ आघाडी अशांतता निर्माण करत आहे. निवडणुका जसजशा पुढे सरकत आहेत, तसतसे इंडी आघाडीचे सदस्य आघाडीतून बाहेर पडू लागले आहेत.
देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी इंडी आघाडी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे.

श्रीराममंदिरासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काँग्रेस फिरूवू शकते !

अयोध्या श्रीराममंदिरासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काँग्रेस फिरूवू शकते. काही लोकांना वाटेल की, हे कसे शक्य आहे ? पण कोणत्याही संभ्रमात राहू नका. स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात ज्यांनी देशाची फाळणी केली, त्यांचा इतिहास असा आहे की, त्यांच्यासाठी देश महत्त्वाचा नाही. त्यांच्यासाठी कुटुंब आणि शक्ती हे सर्व काही आहे.