सांगलीत गुंगीचे औषध देऊन कॅफेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक !
सांगली, १७ मे (वार्ता.) – येथील १०० फुटी रस्त्यावरील ‘हॅग ऑन कॅफे’त अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देत अश्लील व्हिडिओ सिद्ध करून अत्याचार केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी पीडितेने तक्रार दिल्यानंतर आशीष चव्हाण (वय २५ वर्षे, रा. बस्तवडे, तालुका तासगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित मुलगी सांगली येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. काही मासांपूर्वी संशयित आशीष समवेत तिची ओळख झाली होती. आरोपी आशीष हा पीडित मुलीचा सतत पाठलाग करणे, तिच्या भ्रमणभाषवर संदेश पाठवत होता. पीडितेने याला विरोध केला असता त्याने तिला धमकावले होते. २२ एप्रिल २०२४ ते २६ एप्रिल २०२४ या कालावधीत संशयित आशीष याने पीडितेस ‘हॅग ऑन कॅफे’त नेऊन कॉफीमधून तिला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर स्वतःच्या भ्रमणभाषमध्ये अश्लील व्हिडिओ काढून ते प्रसारित करण्याची धमकी दिली, तसेच तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, असे पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.