देशातील निवडणुकीनंतर भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध सुधारतील का ?
१. मरियम नवाज शरीफ यांनी भारतातील पंजाब राज्यातील शिखांशी संवाद साधणे
भारतातील पंजाब राज्यातून शिखांचा एक जथ्था (गट) कर्तारपूर गुरुद्वारा, जो पाकिस्तानमध्ये आहे, तिथे शिखांचा एक महत्त्वाचा सण ‘बैसाखी’ १८ एप्रिल २०२४ या दिवशी साजरा करायला गेला होता. तिथे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला; कारण पाकिस्तानी पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज शरीफ, ज्या पाकिस्तानचे पूर्वपंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या आहेत, त्यांनी या गुरुद्वारामध्ये येऊन या जथ्याशी चर्चा केली. या वेळी मरियम शरीफ यांनी ‘आपले वडील नवाज शरीफ यांची इच्छा आहे की, भारतासमवेतचे पाकचे संबंध मजबूत करायचे आहेत’, असे जथ्यासमोर सांगितले. त्यांना भारताशी व्यापार वाढवून आर्थिक संबंधसुद्धा मजबूत करायचे आहेत. मरियम नवाज शरीफ यांनी हीसुद्धा आठवण करून दिली की, वर्ष २०१५ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दोन देशांमध्ये संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला होता. त्याच वर्षी मरियम नवाज शरीफ यांच्या मुलीचे लग्न होते, ज्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी लाहोरमध्ये खास दाखल झाले होते आणि असे वाटत होते की, दोन्ही देशांचे संबंध सुधारतील; परंतु त्यानंतर पुढच्या १० दिवसांच्या आत पाकिस्तानी सैन्याने जम्मू विमानतळावर ड्रोनद्वारे आक्रमण करून दोन्ही देशांमधील संबंध बिघडवले.
२. पाकिस्तानी विद्वानांचे शिखांविषयीचे घातकी मत
पाकिस्तानमध्ये काही विद्वानांचे असे मत आहे की, पाकिस्तानी मुसलमानांनी पाकमध्ये रहाणार्या शिखांवर आक्रमण करून त्यांना भारतात पाठवण्याची चूक केली. शिखांचा वापर भारतातील हिंदु आणि शीख यामध्ये दरी निर्माण करण्याकरता अन् भारताला तोडण्याकरता करता आला असता. अर्थात् हे विद्वान विसरतात की, शीख धर्माचा उदय भारतातील हिंदूंचे रक्षण करण्याकरताच झाला होता.
मरियम नवाज शरीफ यांनी स्वतःला ‘एक पंजाबी’ म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न करून भारतातील पंजाबच्या जनतेची मने जिंकण्याचा प्रयत्न केला; परंतु हे नक्की आहे की, नवाज शरीफ यांचे लक्ष हे काश्मीर मुद्यावरून कधीच हटणार नाही. एक कारण असे आहे की, नवाज शरीफ यांच्या पत्नी एक काश्मिरी भट होत्या.
३. पाकिस्तानची आर्थिक स्थिती
सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला पोचलेली आहे. एकीकडे पाकिस्तानात महागाईने कहर केलेला आहे, तर दुसरीकडे नैसर्गिक आपत्ती आणि आतंकवाद यांमुळेही नागरिक त्रस्त आहेत. महागाई दरही २५ टक्क्यांच्या पलीकडे आहे. ‘एशियन डेव्हलेपमेंट बँके’च्या आकडेवारीनुसार आशिया खंडातील पाकिस्तान हा राहणीमानाचा व्यय न परवडणार्या देशांत पहिल्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही केवळ १.९ टक्के इतक्या कासव गतीने वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला २४ व्यांदा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कर्ज देणार आहे आणि हे कर्ज मिळवण्याकरता ‘पाकिस्तान एक लोकशाही पाळणारा मवाळ देश आहे’, हे सिद्ध करत आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैन्य पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना भारताशी पाकचे संबंध सुधारायला सांगत आहे.
४. …याची उत्तरे पाकिस्तान आधी देईल का ?
‘भारतामधील निवडणुकीनंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुधारतील का ? पाकिस्तान भारताविरुद्धचे आक्रमक धोरण पालटेल का ? पाकिस्तानमधील आतंकवादी निर्माण करायचे कारखाने बंद केले जातील का ? पाकिस्तान भारताविरुद्ध सध्या चालू असलेला अफू, गांजा, चरस यांचा आतंकवाद थांबवेल का ? पाकिस्तानचे सैन्य भारताशी शांतता निर्माण करायच्या पक्षामध्ये आहे का ?’, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पाकिस्तानला आधी द्यावी लागतील; मात्र मरियम नवाज शरीफ यांनी कर्तारपूर गुरुद्वाराला दिलेली भेट नक्कीच भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्याच्या संबंधात एक महत्त्वाचे पाऊल समजले पाहिजे; कारण हे पाऊल उचलण्याकरता नवाज शरीफ, पाकिस्तानचे राजकीय पक्ष आणि पाकिस्तानी सैन्य यांचा त्यांना नक्कीच पाठिंबा असावा.
५. ‘भारताला कायमचे रक्तबंबाळ करत रहायचे’, हे धोरण पाकिस्तान पालटणार का ?
भारताच्या वेगवेगळ्या पंतप्रधानांनी, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, श्रीमती इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या कालखंडामध्ये पाकिस्तानशी भारताचे संबंध सुधारायचा प्रयत्न केला; परंतु शेवटच्या क्षणाला अपयश आले. असे मानले जाते की, पाकिस्तानी सैन्याचे धोरण एकच आहे, जे कधीही पालटणार नाही, ते म्हणजे ‘ब्लीडिंग इंडिया बाय थाऊजंड कट्स’, म्हणजे ‘भारताच्या अंगावर लहान लहान घाव घालून त्याला कायमचे रक्तबंबाळ करत रहायचे’, हे धोरण पालटणार का ? हा खरा प्रश्न आहे.
६. पुढे काय होईल ? हे येणारा काळच सांगेल !
आतंकवादी ‘तेहरिक ए तालिबान पाकिस्तान’शी (‘टीटीपी’शी) घनिष्ठ संबंध असलेल्या अफगाण तालिबानचे पश्चिम सीमेवर पाकिस्तानला गंभीर आव्हान आहे. असे असूनही पाकिस्तानने भारताविरुद्ध पोसलेल्या आतंकवादी गटांना पोसणार नसल्याचे कोणतेही संकेत अद्याप दिलेले नाहीत, म्हणजेच पाकिस्तान अजूनसुद्धा भारताविरुद्ध लढण्याकरता आतंकवादी गटांना महत्त्वाचे सामरिक शस्त्र समजतो. पुढे काय होईल ? हे येणारा काळच सांगेल; परंतु प्रारंभ चांगला झाला आहे, असे आतातरी म्हणता येईल.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे