नंदुरबार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकार्‍याला ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक !

प्रतिकात्मक चित्र

नंदुरबार – येथील नवापूर शहरात एकाला दारूचे दुकान चालू करायचे होते; पण त्या जागेजवळ ७५ मीटरच्या आत जिल्हा परिषदेची शाळा होती. त्यामुळे  राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्यास अनुमती नाकारली; पण ती शाळा बंद असल्याने त्यासंदर्भात शिक्षण अधिकार्‍यांकडून प्रमाणपत्र आणावे लागणार होते. त्याने नंदुरबार जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी सतीश चौधरी यांच्याकडे साहाय्य मागितले. काम करून देण्यासाठी चौधरी यांनी ५० सहस्र रुपयांची मागणी केली. यावर संबंधितांनी चौधरी यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाच्या पथकाने सापळा रचून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातच लाच घेतांना शिक्षण अधिकारी चौधरी याला रंगेहात पकडले.

संपादकीय भूमिका :

शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात लाचखोरीचा शिरकाव होणे निंदनीय ! अशा लाचखोरांना कठोर शिक्षाच व्हायला हवी !