साधकांच्या लिखाणाचे प्राथमिक संकलन करतांना शिकायला मिळालेली सूत्रे

१. लहानपणापासून मराठी आणि आध्यात्मिक विषयाचे वाचन अन् लिखाण केले नसतांनाही परात्पर गुरु डॉक्टरांनी साधना म्हणून ते सर्व करवून घेऊन आनंद देणे

पू. शिवाजी वटकर

‘माझे बालपण खेड्यामध्ये आणि एका अशिक्षित कुटुंबात गेले. त्यामुळे साहित्य, कला, कविता, गाणी, संगीत इत्यादींचे महत्त्व मला ठाऊक नव्हते. शाळेपासून मला विज्ञान आणि गणित हे विषय आवडत असल्याने मराठी वाङ्मयाचा अभ्यास अन् लिखाण होऊ शकले नाही. एक अभियंता आणि चाकोरीबद्ध व्यावहारिक रुक्ष जीवन जगण्याची मला सवय झाली होती. वर्ष १९८९ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संपर्कात आल्यावर साधनेला आरंभ झाला. मी त्यांचे अभ्यासवर्ग आणि सत्संग यांना जाऊ लागलो. त्यानंतर सत्सेवा चालू झाली. तेच माझ्याकडून हळूहळू साधना, सेवा आणि आध्यात्मिक विषयाचे वाचन अन् लिखाण करवून घेऊन आनंद देत आहेत.

२. वय आणि शारीरिक मर्यादा असतांनाही परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने संकलन सेवेची संधी मिळणे

वर्ष २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे मला बाहेर कुठे जाता येत नव्हते. तेव्हा माझे वय ७४ वर्षे असल्याने धावपळ करून प्रसारसेवा आणि आश्रमसेवा करणे शक्य होत नाही, तसेच मार्च २०२० पासून मला पाठदुखीचा त्रास चालू झाला. तरीही परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने आडव्या पडलेल्या स्थितीत माझ्या साधनाप्रवासाचे आणि कवितांचे लिखाण भ्रमणभाषवर ‘व्हॉईस टायपिंग’, समष्टी जप, व्यष्टी साधना इत्यादी कृती करू शकलो. १० मासांनंतर मला हळूहळू अल्प वेळ बसता येऊ लागले. त्यामुळे दीनदयाळू आणि कृपाळू गुरुमाऊलीच्या कृपेने मला साधकांच्या लिखाणांचे प्राथमिक संकलन करण्याच्या सेवेची संधी मिळाली.

३. शिकायला मिळालेली सूत्रे

३ अ. शारीरिक स्तरावर

३ अ १. वयाच्या मानाने विसरणे आणि कृती करण्याचा वेग अल्प झाला, तरी परात्पर गुरु डॉक्टर सेवा करवून घेणार असल्याची श्रद्धा असणे : वयाच्या मानाने मला व्याकरणाचे नियम, शब्द, शुद्धलेखन इत्यादी लवकर आठवत नाही. शारीरिक मर्यादाही येत आहेत, तसेच सेवेचा वेग आणि सतर्कता यामध्येही मी मागे पडतो. त्यासाठी ‘मला कठोर प्रयत्न करावे लागतील’, याची जाणीव होते. असे असले, तरी ‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्याकडून त्यांना अपेक्षित अशी सेवा करवून घेणार आहेत’, या एकाच वाक्यामुळे मिळेल ती सेवा उत्साहाने करून मला त्यातून आनंद मिळत आहे.

३ अ २. संकलनाची सेवा करण्यासाठी गुरुकृपेने सर्व सोयी, सुविधा आणि साहित्य उपलब्ध असणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी संदर्भासाठी संकलनाचे नियम, व्याकरण, स्वकीय-परकीय शब्द, शब्दरत्नाकर इत्यादी साहित्य उपलब्ध करवून दिले आहे, तसेच संगणक, बैठकव्यवस्था इत्यादींची गुरुकृपेने आवश्यक ती उत्तम सोय केलेली आहे.

३ अ ३. संकलन करणार्‍या साधकांचे साहाय्य  

३ अ ३ अ. सहसाधकांकडून प्रेमभाव, व्यापकता आणि गुरुदेवांप्रती प्रचंड श्रद्धा हे गुण शिकायला मिळणे : संकलन करणार्‍या साधकांची गुणवैशिष्ट्ये जेवढी वर्णावी, तेवढी अल्पच आहेत. ते परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सिद्ध झालेले अत्यंत गुणी साधक आहेत. या साधकांच्या माध्यमातून मला परात्पर गुरु डॉक्टर सेवेसाठी साहाय्य करत आहेत. ‘सेवा करतांना त्यांच्याशी बोलणे, त्यांच्यात मिसळणे, सत्संग मिळणे आणि शिकायला मिळणे ही माझ्यासाठी आनंदाची पर्वणी आहे’, असे मला वाटते. त्यांच्यातील प्रेमभाव, नम्रता, व्यापकता आणि गुरुदेवांप्रती प्रचंड श्रद्धा हे गुण मला शिकता येतात.

३ अ ३ आ. दायित्व असणार्‍या साधिकेकडून सेवा करण्यास प्रोत्साहन आणि आधार मिळणे : सौ. मनीषा पानसरे यांच्याकडे सेवेचे दायित्व आहे. त्यांच्याकडे सहस्रो धारिकांचे संकलन प्रलंबित आहे. साधकसंख्या अल्प आहे. त्यातूनही साधकांना शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास आहेत. तरीही त्या सगळे शांतपणे सांभाळतात. मला पाठदुखीचा त्रास आणि इतर सेवा असतात. मला सेवा देतांना त्या म्हणाल्या, ‘‘सेवा आपल्याकडे पुष्कळ आहे; पण तुम्हाला शक्य होईल, तशी सेवा करा. सहसाधकांचे साहाय्य घ्या. त्यांना अडचणी विचारू शकता.’’ त्यामुळे मला त्यांचा आधार वाटून सेवा करण्यास प्रोत्साहन मिळाले.

३ अ ३ इ. सहसाधिकेकडून संकलन शिकतांना त्यांचे दैवी गुण शिकणे आणि आनंद मिळणे : देवद आश्रमात संकलन करणार्‍या श्रीमती मनीषा गाडगीळ यांना संकलन सेवेचा ६ वर्षांचा अनुभव आहे. काही वेळा त्यांच्याकडे तातडीच्या धारिकांचे संकलन असते. त्यांनी स्वतःची सेवा, व्यष्टी साधना आणि वैयक्तिक कामे याचे नियोजन करून मला संकलन शिकवण्यासाठी वेळ दिला. त्यांनी मला आरंभापासून संकलन करण्यास शिकवले. त्या वेळी मला संकलनाच्या सेवेच्या समवेत त्यांच्यातील साधनेला पोषक असे दैवी गुण शिकता आले. त्या माझ्या चुकाही प्रेमाने आणि नम्रतेने सांगतात. अनेक वेळा त्या ‘छान, छान’ हा शब्दप्रयोग करतात. त्यामुळे मला त्यांच्याकडून शिकायला ‘छान’ वाटते. मला नेहमी सकारात्मक आणि आनंदी रहाता येते.

३ अ ४. संकलन सेवेमुळे शारीरिक त्रास उणावणे : प्राथमिक संकलनाची सेवा चालू केल्यावर एक मासानंतर ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनाचे भावार्थ’ या लिखाणाच्या प्राथमिक संकलनाची सेवा मिळाली. त्या कालावधीत पहाटे ३ ते ३.३० वाजता झोप पूर्ण होऊन मला जाग येत होती. ‘सेवा कशी पूर्ण व्हायची ?’, हे कळत नव्हते. मला मागील १० मासांपासून पाठदुखीचा त्रास आहे; मात्र या कालावधीत त्या त्रासाकडे लक्ष जात नव्हते. तसेच पाठदुखीचा त्रास उणावल्याचे लक्षात आले.

३ अ ५. परात्पर गुरु डॉक्टरांनी करवून घेतलेल्या सेवा आणि साधना यांच्या पूर्वानुभवाचा संकलन सेवा करतांना उपयोग होणे : संकलनासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण असते, उदा. व्यष्टी साधना, कविता, शिकायला मिळालेली सूत्रे, समष्टी सेवा करतांना आलेल्या अनुभूती इत्यादी. परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्याकडून व्यष्टी साधना करवून घेतली आहे, तसेच ‘व्यष्टी आढावा कसा घ्यावा ?’, हे शिकण्यासाठी सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या आढाव्यामध्ये १५ मास शिकण्याची संधी मिळाली. त्यामुळे संकलनासाठी व्यष्टी साधनेविषयी लिखाण असेल, तेव्हा मला त्याचा उपयोग होतो. सनातन संस्थेच्या वतीने गुरुदेवांनी अध्यात्मप्रसार आणि धर्मरक्षण यांची सेवा करवून घेतली आहे. त्यामुळे याविषयीचे लिखाण आले असता त्याचे आकलन आणि संकलन करतांना साहाय्य होते. काही वेळा भावनेच्या भरात लिहिलेल्या किंवा अतिशयोक्ती असलेल्या लिखाणातूनही शिकायला मिळते.

(क्रमशः)

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल(८.३.२०२१)