जून २०२४ पासून मुंबई विद्यापिठात मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम चालू होणार !
मुंबई – मुंबई विद्यापिठात जून २०२४ या शैक्षणिक वर्षापासून मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम चालू केला जाणार आहे. मुंबई विद्यापिठातील हिंदु अध्यासन केंद्राच्या पुढाकारातून मंदिर व्यवस्थापन विषयात ६ मासांचे प्रमाणपत्र आणि १२ मासांचा पदविका अभ्यासक्रम राबवला जाणार आहे.
१. मुंबई विद्यापिठाचे हिंदु अध्यासन केंद्र आणि ‘टेम्पल कनेक्ट’ या संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला. सर्वसामान्यांमध्ये मंदिराचे व्यवस्थापन, प्रशासन आणि संघटन यांविषयी जागृती व्हावी, अशा व्यापक दृष्टीकोनातून या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.
२. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ‘मंदिर व्यवस्थापन’ या अभ्यासक्रमात भारतीय ज्ञान परंपरा, व्यवस्थापन शास्त्राची महत्वाची सूत्रे आणि तत्वे, स्थापत्य, गर्दीचे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, महसूल अन् वित्त व्यवहार, माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर, तसेच पर्यावरण अन् परिसरपूरक अशा अनुषंगिक विषयांवर प्रकाश टाकला जाणार आहे.
३. प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रमात ३ मासांचे कार्यांतर्गत प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. यात मुंबईसह महाराष्ट्र आणि देशातील विविध मंदिरांमध्ये प्रत्यक्ष अनुभवाधारित प्रशिक्षण उपलब्ध होऊ शकेल.
लवकरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातही मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम चालू करणार ! – गिरीश कुलकर्णी, ‘टेम्पल कनेक्ट’याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने ‘टेम्पल कनेक्ट’ या संस्थेचे श्री. गिरीश कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले, ‘‘आम्ही मंदिरांच्या संदर्भात प्रत्यक्ष कृती, प्रशासन आणि व्यवस्थापन यांसंदर्भात काम करतो. आम्ही भारतासह ५७ देशांतील ९ सहस्र ५०० मंदिरांशी संबंधित आहोत. २ दशकांपासून आम्ही मंदिरे आणि त्यांचे न्यास यांच्याशी संबंधित क्षेत्रात कार्यरत आहोत. मंदिरांविषयीची सर्व माहिती आम्ही समाजासमोर आणतो. आम्ही मुंबई विद्यापिठासह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि वेलिंगकर विद्यापीठ येथेही मंदिर व्यवस्थापनाशी संबंधित अभ्यासक्रम चालू करणार आहोत.’’ |
‘एम्बीए इन टेंपल मॅनेजमेंट’ असा अभ्यासक्रम राबवण्याचा विद्यापिठाचा मानस ! – मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णीया अभ्यासक्रमामुळे प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञान परंपरेची ओळख होईल. नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. अभ्यासक्रमाच्या प्रतिसादावर याची व्याप्ती वाढवून ‘एम्बीए इन टेंपल मॅनेजमेंट’ असाही अभ्यासक्रम राबवण्याचा विद्यापिठाचा मानस आहे. सध्या देशातील अनेक मंदिरांत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. सौर ऊर्जा निर्मिती, दानवस्तूंचे व्यवस्थापन, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गर्दी आणि रांग यांचे व्यवस्थापन, अशा क्षेत्रांतही रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत असून प्रशिक्षित तरुणांना रोजगार मिळू शकेल. |
संपादकीय भूमिकामुंबई विद्यापिठाचा स्तुत्य प्रयत्न ! मंदिराप्रमाणेच हिंदु धर्माशी निगडीत विषयांच्या संदर्भातही अभ्यासक्रम चालू व्हावा, ही हिंदूंची अपेक्षा ! |