अकोला येथे १ कोटी रुपयांसाठी व्यापार्‍याचे अपहरण करणार्‍या ५ जणांना अटक !

अकोला – शहरातील प्रसिद्ध व्यापारी अरुणकुमार मघणलाल वोरा यांचे १ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अपहरण करणार्‍या आरोपींचा ५० घंट्यांत छडा लावला. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली असून २ देशी पिस्टलसह कार जप्त केली आहे.

अरुणकुमार वोरा हे १३ मे या दिवशी रायलीजीन येथील दुकान बंद करून घरी जात असतांना २ – ३ अनोळखी व्यक्तींनी त्यांना बळजोरीने कारमध्ये बसवून अपहरण केले होते. या प्रकरणी रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची २ पथके नियुक्त करण्यात आली होती. मिथुन उपाख्य मोंटी इंगळे, किशोर दाभाडे, फिरोज खान युसूफ खान, शरद पुंजाजी, आशीष घनबाहादुर, राजा सरफराज खान, चंदू इंगळे आणि चंदूचा मित्र अशी अरुणकुमार यांचे अपहरण केलेल्या आरोपींची नावे आहेत.

यातील प्रारंभीच्या ५ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आरोपींनी कट रचून गुन्हा केल्याचे मान्य केले आहे. सर्व आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे. त्यांच्यावर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. आरोपींनी कान्हेरी सरफ येथे एका घरात अरुणकुमार यांना कोंडून ठेवले होते. पोलीस मागावर असल्याचे लक्षात येताच अपहरण करणार्‍या आरोपीनेच अरुणकुमार यांना धमकी देऊन रिक्शात बसवून अकोल्याकडे पाठवले.

संपादकीय भूमिका

आरोपींना कारागृहात डांबण्याचीच शिक्षा द्यायला हवी !