संपादकीय : अभ्यासक्रमाचे पुनरुत्थान अत्यावश्यक !
मुंबई विद्यापिठात चालू शैक्षणिक वर्षापासून ‘मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम’ चालू करण्याचा स्तुत्य निर्णय घेण्यात आला आहे. जून २०२४ पासून या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया चालू होत असून ‘हिंदु अध्यासन केंद्रा’च्या पुढाकारातून ‘मंदिर व्यवस्थापन’ या विषयात ६ मासांचे प्रमाणपत्र आणि १२ मासांचे पदविका अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत. ‘सर्वसामान्यांमध्ये मंदिराचे व्यवस्थापन, प्रशासन आणि संघटन यांविषयी जागृती व्हावी’, अशा व्यापक दृष्टीकोनातून या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याही पुढे जाऊन या अभ्यासक्रमाच्या प्रतिसादावर याची व्याप्ती वाढवून ‘एम्.बी.ए्. इन टेंपल मॅनेजमेंट’, असाही अभ्यासक्रम राबवण्याचा विद्यापिठाचा विचार आहे. केवळ प्राथमिक स्तरावरचा विचार न करता पदविका पातळीपर्यंतही हा विषय शिकवण्याचा विद्यापिठाचा निर्णय अत्यंत योग्य आहे. भारत हा असा देश आहे, जिथे मंदिर संस्कृती महत्त्वाची आहे आणि हा असा भाग आहे, जिथे माणसे मोठ्या प्रमाणात एकत्र येतात अन् त्यातून होणार्या विविध प्रकारच्या उलाढालींमुळे तो समाजाच्या आर्थिक चलनवलनाचा मोठा कणा आहे. जानेवारीत अयोध्येतील श्रीराममंदिराच्या स्थापनेनंतर १ लाख कोटी (१ ट्रिलियन) रुपयांच्या चलनवलनाची उलाढाल होत आहे. आंध्रमधील श्री बालाजी मंदिर, महाराष्ट्रातील पंढरपूर, तुळजापूर, कोल्हापूर, शेगाव येथील मंदिरे पाहिली, तर सातत्याने तेथील भाविकांची वाढती गर्दी पहाता आता मंदिर व्यवस्थापन हा अभ्यासक्रम शिकवणे किती अत्यावश्यक झाले आहे, ते लक्षात येते.
मंदिरांच्या स्तरावर विचार केला, तर गाव, तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर अशी अनेक मंदिरे असतात की, ज्यांना सुव्यवस्थापनाची आवश्यकता असते. मंदिराला मिळणारा निधी, भाविकांची गर्दी, त्यांचे व्यवस्थापन, त्यांची रहाण्याची सोय, मंदिरांच्या भूमी आणि त्यावर झालेली अतिक्रमणे, धर्मप्रसाराची व्यवस्था, मंदिर सरकारीकरणामुळे निर्माण झालेल्या अडचणी, विश्वस्तांमधील संवाद-विसंवाद यांसह अनेक गोष्टींविषयी त्यांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. दुर्दैवाने सध्याच्या ‘सेक्युलर’ (निधर्मी) व्यवस्थेत अशी कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही. महाराष्ट्रातील शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर हे सर्वच स्तरावर आदर्श असे आहे. तेथील वातावरण पवित्र, सात्त्विक तर आहेच, त्याखेरीज भक्तांना कोणतीच अडचण न होणारे आहे; मात्र अशी व्यवस्था अन्यत्र कशी राबवावी किंवा राबवतांना त्यातील अडचणी कशा सोडवायच्या ? हे सांगणारे कुणी नाही ! हिंदु जनजागृती समिती गेल्या अनेक वर्षांपासून मंदिरांच्या या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करत असून त्यासाठी मंदिर महासंघाचीही स्थापना करण्यात आली आहे. या संदर्भात शासनाने जर हिंदु जनजागृती समितीसारख्या संस्थांचे साहाय्य, मार्गदर्शन घेतल्यास देशभरातील मंदिरांचे एक व्यापक संघटन निर्माण होऊन समस्त हिंदु समाजालाही दिशादर्शन मिळेल !
अभ्यासक्रमात हिंदुविरोधी विचारांचा भरणा !
स्वातंत्र्यानंतर देशावर सर्वाधिक काळ राज्य करणार्या काँग्रेसने जाणीवपूर्वक अशा प्रकारची शैक्षणिक अभ्यासक्रमाची रचना केली, ज्यामुळे विद्यार्थी भारतीयत्व, हिंदु-भारतीय संस्कृती, प्राचीन परंपरा यांपासून तो लांबच राहील. हा अभ्यासक्रम ज्या केंद्रीय संस्थांद्वारे प्रामुख्याने बनवला जातो, त्या ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ’ (सी.बी.एस्.ई.) आणि ‘राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद’ (एन्.सी.ई.आर्.टी.) या संस्थांनी नेहमीच इस्लास्मिक, पाश्चात्त्य विकृती आणि साम्यवादी विचारांचा उदोउदो करण्यातच धन्यता मानली. या शिक्षण संस्थांनी अभ्यासक्रमच असे सिद्ध केले ज्यामुळे या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत शिकणारे विद्यार्थी पुढे जाऊन हिंदु धर्म, देवता, संस्कृती, राष्ट्रपुरुष यांच्याशी काही देणे-घेणेच राहिले नाही, असेच वागतील.
‘एन्.सी.ई.आर्.टी.’ने अभ्यासक्रमाविषयी नेहमीच हिंदुत्वविरोधी भूमिका घेतली. कधी यातून भगतसिंह आदी क्रांतीकारकांना ‘आतंकवादी’ संबोधून त्यांना अपमान केला, तर कधी भारताच्या मूळ परंपरांचा, जगातील सर्वांत प्राचीन हिंदु संस्कृतीचा विकृत इतिहासच मांडला. बहुसंख्य हिंदूबहुल देशात हिंदु धर्मीय विद्यार्थ्यांना धर्माचरणापासून परावृत्त करण्याचा हा गंभीर प्रकार होता. वर्ष १९६९-७० मध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली होती, जिचा ‘शिक्षणाद्वारे राष्ट्राचे एकीकरण करणे’, हा उद्देश होता. या समितीत राष्ट्रप्रेमी विचारांचे ज्येष्ठ साहित्यकार एस्.एल्. भैरप्पा हे एक सदस्य होते. त्या वेळी भैरप्पा यांनी समितीच्या अध्यक्ष असलेले पार्थसारथी यांना ‘वाराणसीच्या मशिदीकडे नंदी टक लावून पाहिल्यानंतर कोणता निष्कर्ष काढता येईल ? भविष्यात या विषयावर विद्यार्थ्यांनी शिक्षकांना प्रश्न विचारले, तर शिक्षक काय उत्तर देतील ?’ असे विचारल्यावर त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हते. उलट ‘गझनी महंमदने सोमनाथ मंदिर लुटले, औरंगजेबाने काशी आणि मथुरेतील मंदिरे पाडून मशिदी बांधल्या, त्याने जिझिया कर वसूल केला, अशा गोष्टी सांगून मजबूत भारत निर्माण होणे शक्य नाही. सत्याच्या शोधाने अल्पसंख्यांकांच्या भावना दुखावल्या तर…’, असे सांगून सत्य स्वीकारण्यास नकार दिला.
नंतर अर्जुन देव नावाचे साम्यवादी विचारांचे इतिहास व्याख्याते यांना त्या समितीत घेण्यात आले. यामुळे ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ने पुढे प्रकाशित केलेली सर्व पुस्तके काँग्रेस आणि साम्यवादी शासित राज्यांना अपेक्षित अशीच लिहिली गेली. त्यामुळेच गोवा राज्यातील इतिहासाच्या पुस्तकात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ४ ओळीत आणि मोगलांचा इतिहास पालटण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला लढा द्यावा लागला !
सर्वंकष पुनरुत्थान आवश्यक !
पंढरपूर येथील एक प्रथितयश प्राध्यापक डॉ. अतुल आराध्ये यांनी जेव्हा ‘पीएच्.डी.’साठी विषय निवडायचे ठरवले, तेव्हा त्यांच्या गुरूंनी त्यांना ‘वारकर्यांना उपयुक्त होईल’, असा विषय निवडण्यास सांगितले. यावर त्यांनी वारकर्यांना मुखदर्शन सुलभ होण्यासाठी ‘रँप’ (उंचवटा) बसवावा, अशी सूचना केली, तसेच दर्शनासाठी ‘इ-पास’ व्यवस्था राबवण्याची सूचना केली. या दोन्ही सूचनांमुळे वारकर्यांना श्री विठ्ठलाचे समाधानकारक दर्शन मिळत आहे, म्हणजे अशा अभ्यासक्रमांवर ‘डॉक्टरेट’ (विद्यावाचस्पती) होऊ शकते, असा आजपर्यंत कुणी विचारही केला नसेल; पण या निमित्ताने तो समोर आला. या पुढील काळात केवळ ‘हिंदू अध्यासन केंद्रा’च्या माध्यमातून अथवा अन्य कुणाच्या सहकार्याने अशा प्रकारचे अभ्यासक्रम शिकवण्याऐवजी शासनानेच विद्यार्थ्यांना प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शैक्षणिक अशा सर्वच स्तरांमध्ये हिंदु संस्कृती, धर्म यांच्याशी निगडित अभ्यासक्रम शिकवण्याची व्यवस्था करून दिली पाहिजे.
शासनाने विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून मंदिर व्यवस्थापनाचे धडे दिल्यास त्यांच्यात देशव्यापी सुसूत्रता निर्माण होईल ! |