संतसाहित्याचा विद्यार्थी जीवनात उपयोग आहे का ? आणि असल्यास कसा ?
प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !
‘मनुष्याने जीवनभर विद्यार्थी भूमिकेत रहावे’, असे सर्व थोर विचारवंत मानतात. त्यामुळे संतसाहित्याची उपयुक्तता सर्व मानवांनाही आहे. साहित्याची व्याख्या ‘हितेन सहितं साहित्यम् ।’ म्हणजे ‘जे हिताचे साधन होते किंवा हित साध्य करून देते, ते साहित्य होय’, अशी केली आहे. या कसोटीवर केवळ संतवाङ्मयच निर्विवादपणे खरे ठरू शकते. इतर साहित्य प्रकारांचे साहित्यत्व पारखून घेतले पाहिजे.
१. संसारात सुखरूप कसे व्हावे ? हे संत साहित्यात शिकवले जाणे
आज काही नीतीभ्रष्ट विचारवंतांनी स्वतःच्या क्षुद्रस्वार्थाच्या पूर्ततेसाठी संतांच्या साहित्याविषयी बरेच गैरसमज पसरवले आहेत. संतसाहित्याने माणसाला ‘संसार हा दुःखमय आहे’, असे सांगून इहलोकापासून विन्मुख केले, वैराग्याचा प्रचार करून कार्यक्षमता न्यून केली इत्यादी. अशा प्रकारची विधाने अर्धसत्य म्हणून घातक आहेत. संतांनी संसाराचे दुःखमयत्व सांगितले आहे; पण त्याचसमवेत तो सुखरूप कसा होईल, याचे तंत्र शिकवले आहे. ‘ऐसें जेणें जाणितलें । तो सुटला गा ।।’ (ज्ञानेश्वरी, अध्याय ४, ओवी ८१) म्हणजे ‘हे ज्याने जाणले तो या कर्मबंधांतून सुटला.’ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी ‘सुख जालें वो साजणी ।’ म्हणजे ‘अगं साजणी, परमेश्वराचे रूप पाहून मला परमसुख प्राप्त झाले’ किंवा ‘आनंदाचे डोही आनंद तरंग ।’ (संत तुकाराम महाराज) म्हणजे ‘अंतरंगी केवळ आनंदच आनंद’, अशी कितीतरी संतवचने सांगता येतील. ‘दुःखरूप असणार्या या संसारात खर्या अर्थाने सुखरूप कसे व्हावे’, ते संतसाहित्यातून शिकवले जाते.
२. व्यक्ती कार्यक्षम कशी राहू शकते ?
वरवर पहाता ‘वैराग्याने कार्यक्षमता रहात नाही’, असे वाटले, तरी उत्तम आणि दीर्घकालीन कार्यक्षमतेसाठी वैराग्याचीच अधिक आवश्यकता आहे, ही वस्तूस्थिती आहे. आजच्या व्यवस्थापनादी शास्त्रांमध्येही कार्यक्षमतेविषयी चर्चा करतांना कार्यक्षमता बाधित करण्यार्या गोष्टींमध्ये आसक्ती ही प्रमुख गोष्ट मानली जाते. वैराग्य हे आसक्ती दूर करणारे असते. विरक्त मनुष्य हा स्थिरबुद्धीचा होऊ शकतो, तर आसक्त माणूस घायकुतीला (उतावळा) येतो. घायकुतेपणाला कार्यक्षमता समजणे, हा बालिशपणा ठरतो.
व्यवहाराच्या कोणत्याही क्षेत्रातील आदर्श व्यक्तीची लक्षणे भगवद्गीतेत ‘सात्त्विक कार्यकर्ता’ म्हणून सांगितली आहेत.
मुक्तसङ्गोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वितः ।
सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्त्विक उच्यते ।।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १८, श्लोक २६
अर्थ : जो कर्ता आसक्ती न बाळगणारा, मी-माझे न म्हणणारा, धैर्य आणि उत्साह यांनी युक्त, कार्य सिद्ध होवो वा न होवो, त्याविषयी हर्षशोकादी विकारांनी रहित असलेला असतो, तो सात्त्विक म्हटला जातो.
सखोल विचार केला, तर अशा प्रकारची व्यक्तीच खर्या अर्थाने दीर्घकालपर्यंत अत्यंत कार्यक्षम राहू शकते. आजचे व्यवस्थापनशास्त्रज्ञही हे मान्य करत आहेत.
३. संतसाहित्यातून आनंदी जीवन जगण्याचे तंत्रज्ञान मिळणे
एक समाधानी आनंदी जीवन जगण्याचे तंत्रज्ञान संतसाहित्यातून प्रकट होत असते. यासाठी त्याचे चिंतन कल्याणप्रद ठरणारे असते. अनेक वेळा धर्मग्रंथ, स्मृति आणि महाभारत यांसारख्या ग्रंथांमधून सकृतदर्शनी विरुद्ध अर्थाची विसंगत वाटणारी विधाने असतात. प्रामाणिक साधकाला प्रत्यक्ष आचरण कसे करायचे ? याविषयी गोंधळ वाढत जातो, यातून मार्ग कसा काढावा, तेही संतसाहित्यातून शिकवले जाते. जे प्रत्यक्ष विद्यार्थी आहेत, त्यांना या कालावधीत संपूर्ण जीवन चांगले घडवण्यासाठी उपयुक्त अशा पायाभूत गोष्टी आत्मसात करून घेणे आवश्यक आहे. संतसाहित्य अशा कल्याणप्रद गोष्टींची अक्षय अशी खाण आहे.’
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (वर्ष १९९८)
(साभार : ग्रंथ ‘जिज्ञासा’, श्रीवरदानंद प्रतिष्ठान, श्री क्षेत्र पंढरपूर)