साधकांनी एकमेकांना साहाय्य करणे आणि इतरांचे साहाय्य घेणे, असे करतच पुढे जायचे आहे आणि अन्य साधकांना जोडून ठेवायचे आहे !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे साधनेसंदर्भातील अमूल्य मार्गदर्शन
दायित्व असलेले एक साधक : मानसिक आणि आध्यात्मिक त्रास असणारे अन् वयस्कर साधक यांची संख्या अधिक असल्याने त्यांना सांभाळण्यामध्ये वेळ द्यावा लागतो. साधना म्हणून कसे असायला हवे ?
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : काही साधक पूर्ण क्षमतेने सेवा करू शकतात, काही जण मध्यम क्षमतेने, तर काही जण अल्प क्षमतेने सेवा करू शकतात. आपल्या आश्रमाचे दार साधना करणार्या आणि साधना करण्याची इच्छा असणार्या प्रत्येकासाठी उघडे आहे.
बाहेरच्या जगात व्यक्तीची पात्रता पाहिली जाते. ‘व्यक्तीचे वय, क्षमता आणि कौशल्य’, अशा सर्व प्रकारे अभ्यास करून तिला निवडले जाते आणि काम दिले जाते; पण आपण या सगळ्या प्रक्रियेकडे साधना म्हणून पहातो. आपल्याकडे जे साधक जोडले आहेत, ते साधना करण्यासाठी आले आहेत. ‘साधकांकडून किती सेवा होते ? किंवा आपल्याला त्यांच्यासाठी किती वेळ द्यावा लागतो’, असा विचार करण्यापेक्षा तो साधक महत्त्वाचा आहे; कारण साधकांसाठीच आपली संस्था आहे. साधकांनी एकमेकांना साहाय्य करणे आणि इतरांचे साहाय्य घेणे, असे करतच पुढे जायचे आहे. काही वेळा साधकांनी केलेली सेवा तपासण्यात, त्या दुरुस्त करण्यात अन्य साधकांना वेळ द्यावा लागतो; पण यात त्या जिवाला ‘स्वत:कडून थोडीतरी सेवा झाली’, याचे समाधान मिळते. त्यामुळे इतरांना त्या साधकासाठी वेळ द्यावा लागला, तरी चालेल.
संग्राहक – सौ. स्वाती शिंदे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ३६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.३.२०२४)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |