बृहस्पतिसम प्रतिभावान । ब्रह्मर्षि वसिष्ठ होते महान ।

आज १७.५.२०२४ या दिवशी वसिष्ठऋषि जयंती आहे. त्या निमित्ताने…

१७.५.२०२४ या दिवशी वसिष्ठऋषींची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

सुश्री (कु.) मधुरा भोसले यांना त्यांच्याविषयी स्फुरलेले काव्य येथे देत आहोत.

वसिष्ठ ऋषी

ब्रह्मर्षि वसिष्ठांनी केले होते आत्मज्ञानामृताचे पान ।
ते होते बृहस्पतिसम अत्यंत प्रतिभावान ।। १ ।।

श्रेष्ठ असे परम पावन ब्रह्मर्षि वसिष्ठांचे गोत्र ।
दैवीकृपेने त्यांना होते शंभर सुपुत्र ।। २ ।।

ते होते ऋषिपत्नी अरुंधतीचे पती करुणानिधान ।
ते होते ‘शक्ती’ ऋषींचे पिता महान ।। ३ ।।

त्यांच्याकडील ‘नंदिनी’ कामधेनू होती सर्वगुणसंपन्न ।
विश्वामित्रांच्या आक्रमणापासून तिने केले वसिष्ठांचे रक्षण ।। ४ ।।

ब्रह्मर्षि वसिष्ठांच्या मनात नसे हेवा किंवा मत्सर ।
म्हणूनी वसिष्ठ होते सप्तर्षींमध्ये अग्रेसर ।। ५ ।।

सुश्री (कु.) मधुरा भोसले

नाही कठोर, नाही गर्विष्ठ ।
अत्यंत विनम्र होते ब्रह्मर्षि वसिष्ठ ।। ६ ।।

ब्रह्मर्षि वसिष्ठांनी सप्तर्षींचे करूनी नेतृत्व ।
पूर्ण केले त्यांना दिलेले उत्तरदायित्व ।। ७ ।।

ते होते अत्यंत सज्जन आणि गुणवान ।
तसेच ते होते चारित्र्यसंपन्न अन् नीतीवान ।। ८ ।।

ब्रह्मर्षि वसिष्ठ होते ईक्श्वाकूवंशजांचे कुलगुरु ।
ते होते राजा दशरथाचे राजगुरु ।। ९ ।।

ब्रह्मर्षि वसिष्ठ श्रीविष्णूचे अवतार प्रभु श्रीरामाचे ज्ञानगुरु ।
ते होते जणू भक्ती आणि प्रीती यांचे कल्पतरू ।। १० ।।

ब्रह्मर्षि वसिष्ठ होते अखिल विश्वाचे विश्वगुरु ।
ते होते परमतपस्वी आणि परमज्ञानी परात्पर गुरु ।। ११ ।।

ब्रह्मर्षि वसिष्ठ होते ज्ञानाचे अनमोल मोती ।
त्यामुळे जंबुद्वीपात पसरली होती त्यांची कीर्ती ।। १२ ।।

ब्रह्मर्षि वसिष्ठ होते ‘योगवासिष्ठ’ या महान ग्रंथाचे रचनाकार ।
त्यामुळे त्यांचा सर्वत्र झाला जयजयकार ।। १३ ।।

सप्तर्षींचे आहे नक्षत्रांच्या पुण्यलोकात निवासस्थान ।
नक्षत्रलोकात वसिष्ठांसमवेत आहे अरुंधतीलाही मान ।। १४ ।।

वसिष्ठांच्या कुळात होते तपस्वी पराशरऋषि ।
आणि त्यांच्याच कुळात झाले महाज्ञानी व्यास महर्षि ।। १५ ।।

वैराग्य आणि परमज्ञान यांचे प्रतीक होते व्यासपुत्र शुकमुनी ।
राजा परीक्षिताला मोक्ष दिला श्रीमद्भागवताची कथा सांगूनी ।। १६ ।।

अशा महान वसिष्ठऋषींचे करून पुण्यस्मरण ।
कृतज्ञतेने वाहूया त्यांच्या श्रीचरणी हे काव्यसुमन ।। १७ ।।

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.४.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक