Iran To Release 40 Indians : इराण लवकरच अटकेत असलेल्या ४० भारतीय मासेमार्‍यांना सोडणार !

भारताने केली होती विनंती !

भारताची बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल व इराणचे परराष्ट्रमंत्री होसेन अमीर-अब्दोल्लाहियान

तेहरान (इराण) – इराणमध्ये गेल्या ८ महिन्यांपासून अटकेत असलेल्या ४० भारतीय मासेमार्‍यांची लवकरच सुटका होऊ शकते. भारताची बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी त्यांच्या इराणच्या दौर्‍याच्या वेळी इराणचे परराष्ट्रमंत्री होसेन अमीर-अब्दोल्लाहियान यांच्याशी चर्चा करतांना भारतीय मासेमार्‍यांची सुटका करण्याची विनंती केल्यानंतर इराणने याविषयीची प्रक्रिया चालू असल्याचे सांगितले.

सोनोवाल हे चाबहार बंदर करारावर स्वाक्षरी करण्यासाठी इराणला आले असता त्यांनी मासेमार्‍यांचा विषयही उपस्थित केला. या वेळी अब्दुल्लायान म्हणाले की, इराणकडून भारतीय मासेमार्‍यांच्या सुटकेचे काम चालू आहे. काही कायदेशीर सूत्रांमुळे सुटकेला विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले.

सप्टेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत ४ व्यावसायिक नौका इराणच्या समुद्री सीमेतून कह्यात घेण्यात आले होते. त्यांतील ४० भारतीय मासेमारांना अटक करण्यात आली होती.