Air Fare Case : विमानाच्या तिकिटांचे मूल्य निश्‍चित करण्याची मागणी करणार्‍या याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळल्या !

देशातील विमान सेवेचे संचालन उत्तम पद्धतीने चालू आहे ! – देहली उच्च न्यायालय

 नवी देहली – विमानाच्या तिकिटांच्या दरांसाठी एक मर्यादा निश्‍चित करण्यात यावी, अशी मागणी करणार्‍या २ याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या. न्यायालयाने म्हटले की, एखाद-दुसर्‍या घटनेसाठी संपूर्ण हवाई क्षेत्रासाठी नवा नियम लागू करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे अशा जनहित याचिकांची नोंद घेणे योग्य नाही. देशातील विमान सेवेचे संचालन उत्तम पद्धतीने चालू आहे. यामुळे विमानाच्या तिकिटाची मर्यादा निश्‍चित करण्याच्या संदर्भात आम्ही कोणतेही निर्देश पारित करणार नाही.

अधिवक्ता अमित साहनी आणि बेजॉन कुमार मिश्रा यांनी या जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) केल्या होत्या. यात त्यांनी ‘विमानाच्या तिकिटाच्या मूल्यांवर (किमतींवर) मर्यादा असावी, जेणेकरून विमान वाहतूक आस्थापनांकडून होणारी मनमानी थांबेल आणि प्रवाशांची होणारी लूटही थांबवली जाऊ शकेल’, असे म्हटले होते.

रिक्शाचे भाडे अनेकदा विमान तिकिटापेक्षा अधिक असते !

उच्च न्यायालयाने पुढे असेही म्हटले की, विमानाच्या तिकिटाचे मूल्य किती असावे ?, हे बाजारामधील परिस्थितीनुसार ठरवले जाईल. हे क्षेत्र अत्यंत चांगली कामगिरी करत आहे. तुम्ही सद्यःस्थिती पाहिली, तर हवाई क्षेत्र हे स्पर्धात्मक बनले आहे. आजकाल रिक्शाचे भाडेदेखील विमानाच्या तिकिटापेक्षा अधिक असते.