चांगल्या अर्थाने इतिहास पालटण्याचे कार्य चालू झाले आहे ! – विनय सहस्रबुद्धे, माजी खासदार
‘रणझुंजार नानासाहेब पेशवे’ पुस्तकाचा पुणे येथील प्रकाशन सोहळा !
पुणे – वसाहतवादाच्या छायेतून बाहेर पडण्याचे काम आता चालू झाले आहे. यापूर्वी इतिहासामध्ये भारतीय संदर्भ आलेले नाहीत. यामध्ये आपला वैचारिक आळस दिसून येतो; पण आता चांगल्या अर्थाने इतिहास पालटण्याचे कार्य चालू झाले आहे, असे प्रतिपादन भाजपचे माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केले. थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानाच्या वतीने इतिहास अभ्यासक मोहन शेटे लिखित ‘रणझुंजार नानासाहेब पेशवे’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. नानासाहेब पेशवे यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त), डॉ. आनंद भालेराव, अनिरुद्ध देशपांडे, पुष्कर पेशवे, लेखक मोहन शेटे आदी उपस्थित होते.
या वेळी भूषण गोखले म्हणाले की, मराठ्यांचा दीडशे वर्षांचा इतिहास दुर्लक्षित झाला आहे. तो इतिहास अभ्यासकांच्या माध्यमातून पुढे येत असल्याची गोष्ट कौतुकास्पद आहे. शनिवारवाड्याची आजची स्थिती पुरातत्व विभागाने सुधारायला हवी. एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणून त्याचा विकास होऊ शकेल.