बाणावलीतील समुद्रकिनार्यावर सकाळी धावण्यासाठी गेलेल्या तरुणीवर भटक्या कुत्र्यांकडून आक्रमण !
एका पर्यटक जोडप्यामुळे तरुणी वाचली
मडगाव, १५ मे (वार्ता.) – बाणावलीतील समुद्रकिनार्यावर १४ मे या दिवशी पहाटे धावण्यासाठी गेलेल्या लोटली येथील २४ वर्षीय तरुणीवर भटक्या कुत्र्यांनी आक्रमण करत तिच्या शरिरावर ६ – ७ ठिकाणी चावे घेतले. सुदैवाने त्याच वेळी तेथे पर्यटनासाठी आलेल्या एका जोडप्याने कुत्र्यांच्या तावडीतून या तरुणीची सुटका केली. त्यानंतर या तरुणीला त्वरित लोटली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले.
तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, ‘ती आणि तिचा मित्र यांनी १४ मे या दिवशी सकाळी बाणावलीतील समुद्रकिनार्यावर धावण्यासाठी जाण्याचे ठरवले. तिचा मित्र समुद्रकिनार्याच्या प्रवेशद्वारापाशी तिची वाट पहात होता. ती समुद्रकिनार्यावर धावून प्रवेशद्वाराकडे परतत असतांना अचानक ७ कुत्र्यांनी तिच्यावर आक्रमण केले. तिने कुत्र्यांना हाकलण्याचा आणि प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी तिच्या मांड्या आणि पाय यांवर चावे घेतले. त्या वेळी ती साहाय्यासाठी ओरडू केली. तेव्हा एका पर्यटक जोडप्याने येऊन त्यांच्या तावडीतून तिची सुटका केली.’
पर्यटकांसाठी चेतावणी ! – तरुणीच्या वडिलांची प्रतिक्रिया
या घटनेनंतर या तरुणीचे वडील म्हणाले, ‘‘ही घटना म्हणजे पर्यटकांसाठी चेतावणी आहे. लहान मुले, त्यांचे कुटुंबीय आणि पर्यटक यांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित अधिकार्यांनी योग्य उपाययोजना काढली पाहिजे; कारण अशी घटना कुणाचाही संदर्भात घडू शकते.’’
संपादकीय भूमिकाभटक्या कुत्र्यांची समस्या सोडवू न शकणे प्रशासनाला लज्जास्पद ! यास उत्तरदायी असलेल्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे ! |