गोव्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेत मुलींची सरशी !
|
पणजी – गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १ एप्रिल ते २४ एप्रिल २०२४ या कालावधीत इयत्ता दहावीच्या घेतलेल्या परीक्षेचा निकाल १५ मे या दिवशी घोषित करण्यात आला. राज्याचा एकूण निकाल ९२.३८ टक्के लागला असून यामध्ये विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.८० टक्के, तर विद्यार्थिनींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.९३ टक्के आहे. यंदाच्या वर्षी मुलींची सरशी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ४ टक्क्यांनी घटली आहे. वैशिष्ट्य म्हणजे सत्तरी तालुक्यातील गुळेली, अडवई, पिसुर्ले, मोर्ले, दाबे, सावर्डे, सुर्ला येथील सरकारी माध्यमिक शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यंदा अनुदानित ३१९ शाळा, विनाअनुदानित ११ खासगी शाळा आणि सरकारी ७८ शाळा, अशा एकूण ४०८ शाळांमधील विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. एकूण ९ सहस्र ३१८ विद्यार्थ्यांपैकी ८ सहस्र ५५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर एकूण ९ सहस्र ५९६ विद्यार्थीनींपैकी ८ सहस्र ९१८ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. ३८ मुलांचा, तर ५९ मुलींचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.
इयत्ता दहावीची बाहेरून परीक्षा देणार्या ३६० मुलांपैकी ३६ विद्यार्थी (१० टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. यासह गेल्या वर्षी काही विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या आणि यंदा ते विषय घेऊन बसलेल्या २३२ मुलांपैकी ८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गोवा सरकारच्या वतीने वर्ष २०१७ पासून चालू करण्यात आलेल्या एका योजनेद्वारे दहावीचे शिक्षण न घेतलेल्या; पण किमान २ वर्षे ‘औद्योगिक तंत्रज्ञान संस्थे’च्या (‘आयटीआय’च्या) कुठल्याही एका शाखेचा २ वर्षांचा अभ्यासक्रम (कोर्स) पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीची परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ते दहावीचा इंग्रजी भाषा विषय आणि दुसर्या कुठलीही एका भाषेचा विषय निवडून त्यांत उत्तीर्ण झाल्यास त्यांना दहावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाते. असे ‘आयटीआय अभ्यासक्रम’ पूर्ण केलेल्या १० विद्यार्थ्यांपैकी ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.