गुरुदेव समवेत असल्याच्या संदर्भात मुंबई येथील श्री. हेमंत पुजारे यांना आलेल्या अनुभूती
१. आश्रमातून गावी गेल्यावर सद्गुरु सत्यवान कदम यांनी सेवेचे नियोजन करून देणे
‘मी मुंबईत स्वसंरक्षण प्रशिक्षणाची सेवा करत असतांना मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्याची संधी मिळाली. प्रक्रिया संपल्यावर मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझ्या गावी गेलो. तेथे गेल्यावर मला पुष्कळ अडचणी आल्या. मला गावाला रहावे लागणार होते. तेव्हा ‘आता गावी मी सेवा कशी करणार ?’, असा मला प्रश्न पडला. त्या वेळी ‘मी मुंबईला जाऊन सेवा करू शकत नाही’, याची मला खंत वाटत होती. अशा वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही दिवसांतच सद्गुरु सत्यवान कदम यांच्या माध्यमातून मला २ वेळा ‘हिंदु राष्ट्रजागृती सभे’त सूत्रसंचालन करण्याची सेवा मिळाली. सद्गुरु सत्यवानदादांनी माझे सेवेचे पुढील नियोजनही लगेच करून घेतले. ‘माझी साधना व्हावी’, यासाठी सद्गुरूंचे मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे ‘गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) माझ्या समवेत आहेत’, असे मला वाटायचे.
२. अनेक प्रसंगांमध्ये गुरुदेवांनी सत्संगात सांगितलेली सूत्रे आठवून सकारात्मक रहाणे
गावाला असतांना मला अनेक अडचणी येत होत्या. त्या वेळी गुरुदेवांनी सत्संगात सांगितलेली सूत्रे वाचली की, मला पुष्कळ सकारात्मक वाटायचे. ‘गुरुदेव माझ्या समोर असून तो सत्संग आता चालू आहे’, असे मला जाणवायचे आणि मला साधनेसाठी आवश्यक असलेली ऊर्जा मिळायची. त्यामुळे माझी सकारात्मकता वाढत होती.
३. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी पुढील साधनेची दिशा देणे
अशा स्थितीत एकदा मला सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी सेवेसाठी मुंबईला बोलावले. मुंबईला आल्यावर त्यांनी आधी माझी स्थिती जाणून घेतली आणि लगेचच नामजपादी उपाय सांगून मला साधनेची पुढील दिशाही दिली. त्यांचा मला पुष्कळ आधार वाटला. ‘केवळ संतच मला मोक्षप्राप्तीची दिशा दाखवू शकतात’, या विचाराने मला सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
पूर्वी ‘मी आश्रमातून बाहेर गेलो, तर माझ्या साधनेचे कसे होईल ?’, असे मला वाटायचे; परंतु गुरुदेवांनी सद्गुरु सत्यवान कदम आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या माध्यमातून माझ्या मनातील प्रश्न दूर करून ‘गुरुदेव सतत माझ्या समवेत आहेत’, याची मला अनुभूती दिली.’
– श्री. हेमंत पुजारे, मुंबई (२१.८.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |