सती प्रथेमागील वस्तूस्थिती

सतीची प्रथा म्हटल्यावर बहुतांश लोक असे म्हणतात की, सती म्हणजे नवर्‍याच्या मृत्यूनंतर स्वतःहून किंवा सामाजिक दबाव आल्याने आत्महत्या करण्याची प्रथा ! ही प्रथा कधी चालू झाली आणि का झाली ? याचा विचार करणे आवश्यक आहे. आजच्या लेखाच्या माध्यमातून सती प्रथेविषयी ब्रिटिशांनी कसा अपप्रचार केला आणि वस्तूस्थिती काय आहे ? हे जाणून घेणार आहोत.

१. ब्रिटिशांनी केलेले इतिहासाचे विकृतीकरण

आताची शिक्षणपद्धत भारतियांनी सिद्ध केली नाही, तर ब्रिटिशांनी सिद्ध केली आहे. त्यांनी एवढी हुशारीने ही शिक्षणपद्धत सिद्ध केली होती की, आपण आपल्याच इतिहासापासून दूर जाऊ. त्यांच्या शिक्षणपद्धतीविषयी त्यांना एवढा विश्वास होता की, मॅक्सम्यूल्लर याने अत्यंत विश्वासाने म्हटले होते, ‘भारत एकदा जिंकून घेतला; परंतु आता दुसर्‍यांदा शिक्षणाच्या माध्यमातून भारत जिंकला पाहिजे.’ आपल्यामध्ये आपला इतिहास किंवा आपली संस्कृती याविषयी एवढी अनभिज्ञता का आहे ? अशा प्रकारे इतिहासाचे विकृतीकरण केल्याचे एक उदाहरण म्हणजे सती प्रथा !

२. सती प्रथेचे ब्रिटिशांनी केलेले विश्लेषण

ब्रिटिशांचे म्हणणे होते की, सती प्रथा ही अशी एक वेगळी प्रथा आहे, ज्यामध्ये नवर्‍याच्या मृत्यूनंतर विधवेला जगण्याचा अधिकार नव्हता; म्हणून त्यांना बलपूर्वक आगीत ढकलून आत्महत्या करण्यास भाग पाडले जात होते. याच्या विरोधात विलीयम कॅरे आणि राममोहन राय होते. ब्रिटिशांच्या म्हणण्यानुसार सती ही प्रथा अधिक करून बंगालमध्ये होती. प्रत्यक्षात बंगालच्या संस्कृतीमध्ये सती ही प्रथा अस्तित्वातच नव्हती. सतीची प्रथा राजस्थानमध्ये दिसून येत होती. ब्रिटिशांच्या या दाव्यावर भारतातील इतिहास संशोधक मीनाक्षी जंजी यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी याविषयी केवळ विश्लेषण केले नाही, तर योग्य संशोधन करून आपला निष्कर्ष मांडला.

३. ब्रिटिशांनी सती प्रथेविषयी केलेला अपप्रचार

त्या वेळी जे युरोपमधून प्रवासी भारतात येत होते त्यांनी मांडले की, भारतामध्ये सती ही एक अनोखी प्रथा आहे आणि बर्‍याच प्रवाशांनी हेच सूत्र परत परत लिहिले. त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात स्त्रिया सती जातात, असा समज निर्माण झाला. यामागे ब्रिटीश मिशनरींचा ‘भारत हा अयोग्य प्रथा असणारा देश आहे’, असे त्यांच्या शासकांना आणि तिथे मिशनरींची आवश्यकता आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे त्यांनी सती जाणार्‍यांची संख्या ५० सहस्र किंवा लाखाच्या घरात आहे, असे मांडले. प्रत्यक्षात भारतात सती जाणार्‍यांची संख्या पुष्कळ अल्प आहे. ही आकडेवारी बंगालमधील आहे, असे सांगण्यात आले; परंतु बंगालमध्ये सती जाण्याची प्रथा नाही. सती आणि जोहार हे मूळ राजस्थानमधील आहेत. स्वातंत्र्यानंतर संपूर्ण भारतात सती गेलेल्यांची संख्या ४० होती आणि यापैकी दोन तृतीयांश संख्या राजस्थानमधील होती. त्यामुळे जेव्हा बंगालमध्ये बेंटीक याने ‘सती प्रथेवर बंदी आहे’, असा आदेश काढला. त्याच्या दुसर्‍या दिवशीपासून बंगालमध्ये सतीची प्रथा बंद झाली.

४. महिला सती का जात ?

जेव्हा दुसरे आक्रमक म्हणजे मोगल किंवा ब्रिटीश आपल्यावर आक्रमण करत होते, तेव्हा राज्यातील राजाला मारल्यानंतर त्यांच्या बायकांवर अत्याचार करून त्यांना मारत असत किंवा त्यांना विकले जात असे. अशा प्रकारामुळे त्या वेळच्या राज्यात असा विचार झाला की, युद्धात राजाचा मृत्यू झाला, तर त्याची पत्नी मोगलांच्या हातात पडण्यापेक्षा विहिरीत उडी मारून किंवा स्वतःला आगीत जाळून घेऊन आपले जीवन संपवावे. या प्रकारे मरण्याला एक मानाचे समजले जात होते. राजस्थानमध्ये आगीत जाळून घेण्याच्या प्रकाराला ‘जोहार’ म्हणत होते. इतिहासात याची पुष्कळ उदाहरणे आहेत. राणी पद्मावतीने केलेला ‘जोहार’ प्रसिद्ध आहे. शीख पंथातही अशी उदाहरणे आहेत. जेव्हा महाराजा रणजितसिंह यांचा मृत्यू झाला, तेव्हा त्यांच्या पत्नी सती गेल्या. प्रत्यक्षात शीख पंथाचा सती या प्रथेशी कोणताही संबंध नव्हता. पंजाबमध्येही सतीची मंदिरे आहेत.

५. सती प्रथेविषयी असलेले ब्रिटिशांचे कटकारस्थान !

आता असे प्रकार केवळ भारतातच होत नव्हते, तर इतर देशातही होत होते. जपानमध्ये सामुराई संस्कृतीमध्ये ‘सेबुकु’ नावाची एक प्रथा आहे, जी प्रत्येकाला शिकवली जात होती. यानुसार केवळ महिलाच नव्हे, तर पुरुषही वेळप्रसंगी स्वतःची हत्या करून घेत असत. ज्या वेळी विलीयम बेंटीक ‘सतीची प्रथा ही अनोखी प्रथा आणि वाईट प्रथा’, असे म्हणत होता, त्या वेळी त्यांच्या देशात जवळजवळ २ सहस्र ५०० महिलांना शोधून शोधून मारले गेले. युरोपमध्ये २ सहस्र ५०० वर्षांपूर्वी ‘विच हंटींग’ नावाची एक परंपरा चालत आली आहे. जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड वगैरे युरोपमधील सर्व देशांमध्ये ही प्रथा होती. ज्यांच्या पतीचा मृत्यू झालेला आहे, अशा महिलांना गावात शोधून शोधून ‘चेटकीण’ समजून मारले जात होते. त्यांना जिवंत जाळणे, भूमीत खड्डा करून गाडणे, केस पकडून त्यांना खेचून नेणे अशा प्रकारचे अत्याचार त्यांच्यावर होत होते. यावर विलीयम बेंटीकने चर्चा केली नाही, उलट भारतात एखाद्या महिलेवर अत्याचार झाला, तर त्याला जगभर प्रसिद्धी दिली. भारतातील महिलांच्या डोक्यात हे अशा प्रकारे भरवले गेले की, त्या आपल्याच संस्कृतीच्या विरोधात जातील. अशी प्रथा जगात आणखी कुठेही नाही, केवळ भारतीय संस्कृतीतच आहे, असे दाखवले गेले. यावरून हे सिद्ध होते की, ब्रिटिशांचे हे समजून केलेले कटकारस्थान होते.

६. हिंदूंनी हिंदु संस्कृतीपासून दूर जावे, यासाठी ब्रिटिशांनी अपप्रचार करणे

सती जाण्याची प्रथा अत्याचारापासून वाचवण्यासाठी होती; परंतु भारताची विभागणी करण्यासाठी या प्रथेचा प्रचार केला गेला. यामुळे भारताची संस्कृती नष्ट होऊन भारतावर राज्य करता येईल. सती प्रथा ही अधिक करून राजस्थानशी जोडली आहे; कारण त्यांच्यावर मोगलांची आक्रमणे होत होती; परंतु देशात इतरत्र अशी प्रथा नव्हती. ब्रिटिशांनी भारतियांच्या मनात हे भरवले की, ही वैदिक संस्कृती आहे. वेदांमध्ये अशा प्रकारच्या प्रथेविषयी कोणताही उल्लेख नाही. उलट विधवा स्त्रियांना मानसन्मान होता. उदा. महाभारतातील कुंती जी सती गेली नाही. माद्री सती गेली होती; कारण ती पतीच्या मृत्यूविषयी स्वतःला गुन्हेगार समजत होती. यावरून लक्षात येते की, आम्ही आमच्याच संस्कृतीचा द्वेष करून संस्कृतीपासून दूर जावे, असा ब्रिटिशांचा उद्देश होता. बर्‍याच प्रमाणात हे त्यांना साध्य झालेही आहे.

७. ब्रिटिशांनी सतीची प्रथा बंद केल्याची अफवा पसरवणे

इतिहासात लक्षात येते की, सती जाण्याचे प्रकार हे केवळ क्षत्रियांमध्ये होत होते. क्षत्रिय म्हणजे त्यांना युद्धावर जावे लागत होते. ही प्रथा केवळ इस्लामी आक्रमणानंतर चालू झाली. लोक म्हणतात की, ब्रिटिशांनी ही प्रथा बंद केली आणि लगेच ती बंद झाली. जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा जातीभेद हा अवैध ठरवला गेला होता; परंतु हे प्रमाण अल्प झाले आहे का ? अजूनही कित्येक िठकाणी जातीवरून भेदभाव केला जातो. ब्रिटिशांद्वारे या प्रथेला प्रसिद्धी दिली गेली आणि ब्रिटिशांच्या एका आदेशाने ही प्रथा बंद झाली, असे दाखवले गेले. प्रत्यक्षात जे काही घडलेच नाही, ते घडले असे दाखवण्यात आले. त्या वेळी लोकांना सांगणारे कुणी नव्हते; परंतु आज आपण विश्लेषण करून काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे, हे ठरवू शकतो. त्यामुळे उगीच अंधपणे कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. तुम्ही स्वतः संशोधन करा. आपल्या देशात असेही लोक आहेत की, जे आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहेत; परंतु आपण संशोधन केल्यास हे सर्व लक्षात येईल.

(साभार : विविध संकेतस्थळे)