प्लास्टिक नकोच !
श्वासावाटे फुप्फुसात प्लास्टिकचे सूक्ष्म कण जात असल्याचे संशोधन आता पुढे आले आहे. या कणांनी फुप्फुसाला हानी होते. फुप्फुसाचा कर्करोग झालेल्या रुग्णांच्या नमुन्यांमध्ये प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळून आले आहेत. प्लास्टिक आस्थापनांमध्ये काम करणार्या कर्मचार्यांना फुप्फुसाचा कर्करोग होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. राज्यात ५० मायक्रॉनपेक्षा न्यून जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे, तरीही आज बाजारात भाज्या, फळे, मासे, मांस यांच्या विक्रेत्यांकडून या पातळ पिशव्या न मागताही मिळतात. २६ जुलै २००५ या दिवशी मुंबईत आलेल्या महाप्रलयाने मनुष्यहानीसह अपरिमित वित्तहानीही झाली होती. या वेळी पाणी तुंबून रहाण्यामागे इतस्तत: फेकल्या गेलेल्या प्लास्टिक पिशव्या कारणीभूत ठरल्याचे लक्षात आल्यावर मुंबईसह राज्यात लागू करण्यात आलेल्या प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीला आज पुरता हरताळ फासला गेला आहे. जनावरांच्या पोटात या प्लास्टिकच्या पिशव्या गेल्याने प्रतिवर्षी कितीतरी प्राण्यांचा मृत्यू होतो. पर्यावरणासह जैविक आणि वित्तीय हानी करणार्या प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी ही आज केवळ नावाला शिल्लक आहे.
डॉ. परव शर्मा यांनी केलेल्या संशोधनातून हे स्पष्ट केले आहे की, प्लास्टिकमध्ये असलेले शिसे, पारा आणि कॅडमियम यांमुळे जन्मजात विकार होऊ शकतात. प्लास्टिकमध्ये ‘बीपीए बिस्फेनॉल ए’ हे घातक विष असते; जे झाडे, झुडपे आणि पिके यांना हानी पोचवते. प्लास्टिकच्या अतीवापरामुळे दमा आणि फुप्फुसाचा कर्करोग होतो. अन्नाद्वारे पोटात जाणारे प्लास्टिक कण यकृत आणि मूत्रपिंड यांना हानी पोचवतात. प्लास्टिक कणांमुळे मेंदूलाही इजा होते. ल्युकेमिया, लिंफोमा, मेंदूचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, तसेच प्रजनन क्षमता अल्प होणे यांसारखे विकार प्लास्टिकच्या कणांमुळे जडू शकतात. सामाजिक संस्था आणि सरकारही विविध माध्यमांतून दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर टाळण्याविषयी जनजागृती करतात; मात्र प्लास्टिकच्या वापरावर हवा तसा अंकुश आणण्यासाठी आज काहीच उपाययोजना केल्या जात नाहीत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्लास्टिकचा वापर टाळण्याविषयी काही ठोस निर्णय घेतले होते; पण काही काळानंतर पुन्हा प्लास्टिकचा बेसुमार वापर चालू झाला आहे. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्या प्लास्टिकची आज आपल्याला एवढी सवय झाली आहे की, प्लास्टिक बंदी झाल्यावर काय होईल ? याची कल्पनाही आपल्याला करवत नाही. प्लास्टिकमुळे होणारी अपरिमित हानी लक्षात घेता त्याचा वापर टाळलाच पाहिजे. प्लास्टिकचे गंभीर दुष्परिणाम लक्षात घेऊन आज त्यावर उपाय काढले नाहीत, तर भविष्यात मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल !
– श्री. जगन घाणेकर, मुंबई