पुणे येथे रस्त्याच्या कडेला, इमारतींवरील महाकाय होर्डिंग्जमुळे नागरिकांच्या जिवाला धोका !
अजून किती जणांचा मृत्यू झायावर अवैध होर्डिंग्जवर कारवाई होणार ?
पुणे – महापालिकेने २ सहस्र ४०० पेक्षा अधिक होर्डिंग्जना मान्यता दिली आहे. फक्त ८५ अवैध होर्डिंग्ज शहरात आहेत, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. रस्त्याच्या कडेला, इमारतींवर महाकाय होर्डिंग्ज उभी आहेत. त्यात राज्य सरकारने केलेल्या नियमावलींचे उल्लंघन केले, तरी कारवाई होत नाही. होर्डिंग्जचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ (स्थापत्य सर्वेक्षण) संबंधित व्यावसायिक करतो; पण त्याची उलटतपासणी करण्याची यंत्रणाच महापालिकेकडे नसल्याने केवळ कागदोपत्री घोडे नाचवले जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका आहे.
गेल्या महिन्यात नगर रस्त्यावर वाघोली येथे वादळी पावसात भले मोठे होर्डिंग कोसळले. त्यानंतर १३ मे या दिवशी मुंबई येथे आलेल्या वादळात होर्डिंग पडून १७ जणांचा मृत्यू झाला आहे. व्यावसायिक, आस्थापने, शैक्षणिक संस्था, शिकवणीवर्ग चालक, राजकीय पुढारी यांचे कार्यक्रम आणि इतर उपक्रम यांच्या विज्ञापनांसाठी चौकांमधील, रस्त्यावर होर्डिंग्जला प्राधान्य देतात. यातून होर्डिंग्ज व्यावसायिकाला महिन्याला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सांगितले की, शहरातील सर्व होर्डिंग्जचे ऑडिट करण्याचा आदेश आकाशचिन्ह विभागाला दिला आहे. शहरात ८५ अवैध होर्डिंग्ज आहेत. १ सहस्र ५६४ वर कारवाई करण्यात आली आहे. जर अवैध होर्डिंग उभारले, तर संबंधितांवर गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला आहे.