काँग्रेसने अर्थसंकल्पामध्ये हिंदु-मुसलमान असा भेद केला ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई – काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाच्या संपत्तीवर प्रथम मुसलमानांचा हक्क असल्याचे म्हटले. त्या बैठकीला मी स्वत: उपस्थित होतो आणि मी त्याला विरोध केला. काँगेसने अर्थसंकल्पामध्ये हिंदु आणि मुसलमान असा भेद केला. काँग्रेसने धर्माच्या आधारे अर्थसंकल्पाची विभागणी केली. काँग्रेसने ‘व्होट जिहाद’ चालू केला, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली. कल्याण येथे लोकशाही विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत ते बोलत होते.

या वेळी नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘काँग्रेसने मुसलमानांसाठी अर्थसंकल्पातील १५ टक्के निधी दिला. काँग्रेस पुन्हा सत्तेत आली, तर असेच करणार आहे. यातून देशाचे भले होईल का ? मला माझ्या प्रतिमेपेक्षा देशाची एकता महत्त्वाची आहे. काँग्रेसने धर्माच्या आधारावर देशाची विभागणी केली. देशाची विभागणी करणारे भारतियांच्या मताचे दावेदार आहेत का ? काँग्रेसने आतंकवादाचे समर्थन केले आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केला. भ्रष्टाचाराला शिष्टाचार केला. असे लोक देशाचे नेतृत्व करू शकतात का ? काँग्रेस कधीही विकास करू शकत नाही.’’

भारत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने, बुलंद विश्वासाने मोठे लक्ष्य पार करत आहे. मी आता जेवढे कष्ट घेत आहे, तेवढे निवडणुकीनंतरही कष्ट करू. सत्तेत आल्यानंतर १०० दिवसांत काय करणार, याची आमची ‘ब्लू प्रिंट’ सिद्ध आहे. यानुसार आम्ही मार्गक्रमण करणार आहोत, असे नरेंद्र मोदी यांनी भाषणात म्हटले.