पुणे, शिरूर येथील उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची ३ वेळा तपासणी !

उमेदवारांना तिसर्‍यांदा नोटीस !

पुणे – पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे या दिवशी मतदान पार पडले. या निवडणुकीसाठी सर्वाधिक प्रचार खर्च शिरूरचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी केला आहे. त्यांचा खर्च ७४ लाख ९७ सहस्र रुपये असून त्याखालोखाल पुणे येथील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी ६९ लाख ४१ सहस्र रुपये खर्च केला आहे. शिरूर येथील महाआघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी ५३ लाख ६९ सहस्र आणि पुण्याचे महाआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी ४६ लाख ४३ सहस्र रुपये खर्च प्रचारावर केला आहे; मात्र या चारही उमेदवारांच्या प्रचार खर्चात फरक येत असल्याने शिरूरचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे आणि पुण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी तिसरी नोटीस बजावली आहे. या उमेदवारांच्या प्रतिनिधींनी काही खर्च मान्य केला, तर काही खर्च अमान्य केला होता. शेवटच्या खर्च तपासणीतही या चौघांच्या निवडणूक प्रतिनिधींनी सादर केलेला खर्च आणि प्रशासनाच्या शॅडो रजिस्टरमधील खर्चात फरक आला आहे.