होर्डिंग्ज आणि अवाढव्य फलक यांचे स्थापत्य सर्वेक्षण तात्काळ करावे !
मुंबई दुर्घटनेनंतर सांगली येथे ‘लोकहित मंचा’ची निवेदनाद्वारे मागणी !
सांगली, १५ मे (वार्ता.) – मुंबई येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे १४ मे या दिवशी ‘लोकहित मंचा’च्या वतीने ‘ऑनलाईन’ निवेदन देण्यात आले. यामध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील होर्डिंग्ज आणि अवाढव्य फलक यांचे स्थापत्य सर्वेक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) तात्काळ करण्याची मागणी करण्यात आली आहे’, अशी माहिती ‘लोकहित मंचा’चे अध्यक्ष श्री. मनोज भिसे यांनी दिली. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ? – संपादक)
या निवेदनात मनोज भिसे यांनी म्हटले आहे की, पावसाळ्यात वार्याचा वेग लक्षात घेऊन फ्लेक्स किंवा होर्डिंग्ज लावण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून अनुमती दिली जाते का ? याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. अनेकदा होर्डिंग्जमुळे रस्त्यावरील सिग्नल झाकले जातात. वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. याविषयी कारवाई करण्यात यावी. महापालिका क्षेत्रात विविध मार्गांवरील होर्डिंग्ज किंवा फ्लेक्स यांना अनुमती देतांना ते निखळून पडल्यास त्यातून कोणता धोका उद्भवू शकतो, याचाही विचार होणे आवश्यक आहे.
संभाव्य दुर्घटना लक्षात घेऊन शहरातील सर्वच होर्डिंग्जचे ठराविक कालावधीनंतर स्थापत्य सर्वेक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात यावे आणि त्याचा अहवाल प्रशासनाच्या संबंधित विभागाकडे पाठवण्यात यावा, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. भाजपचे सांगली जिल्हा सरचिटणीस आणि मिरज येथील ज्येष्ठ पत्रकार श्री. मोहन वाटवे यांनीही यापूर्वीच महापालिका आयुक्त अन् प्रशासन यांच्याकडे या संदर्भात अनेक वेळेला अशी जाहीर मागणी केली आहे, असे त्यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका :वादळात होर्डिंग्ज पडल्यामुळे मोठी जीवितहानी झाल्यावरही प्रशासनाला जागे का करावे लागते ? |