सातारा येथे पाण्याच्या टाकीला गळती लागल्यामुळे लाखो लिटर पाणी गेले वाहून !
सातारा, १५ मे (वार्ता.) – सध्या सातारा शहरात पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. शहराच्या पश्चिम भागातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यातच कोटेश्वर टाकीतून कमी दाबाने पाणी येणे आणि गळती लागून पाणी वाहून जाणे, असे प्रकार सतत घडत आहेत. गळतीचे पाणी ओढ्यातून वाहून जात आहे. (यातून पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार समोर येतो. – संपादक)
टाकीचा व्हॉल्व्ह नादुरुस्त असल्यामुळे पाण्याचे नियमन करणे कठीण झाले आहे. सातारा पालिकेचे पाणी नियोजनाचे धोरण चुकीचे असून नळकरी चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत. कोटेश्वर टाकीचे व्हॉल्व्ह आणि पाणी नियमन वेळापत्रक बिघडल्यामुळे वाहून जाणारे लाखो लिटर पाणी ओढ्यात सोडून देण्यात येत आहे. सातारा शहरामध्ये पाण्याच्या एकूण १३ टाक्या आहेत. अनेक टाक्यांचे व्हॉल्व्ह लोखंडी असून त्यांना गंज लागला आहे. त्यामुळे नळकरी कर्मचार्यांना पाणी सोडतांना व्हॉल्व्ह फिरवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. ही टाकी ५ लाख लिटर क्षमतेची असून टाकीमध्ये पूर्ण क्षमतेने पाण्याचा साठा होत नाही. त्यामुळे या परिसरात तीव्र पाणीटंचाई जाणवते. नगरपालिकेचे नळकरी हे तांत्रिकदृष्ट्या कुशल असले, तरी पाण्याच्या टाकीचे व्हॉल्व्ह जुने झाले आहेत. त्यामुळे त्यांची दुरुस्ती अत्यावश्यक आहे. शहापूर आणि कास या दोन्ही पाणीपुरवठा योजनांचे सातारा शहरांमध्ये ४० हून अधिक व्हॉल्व्ह आहेत. त्यांची दुरुस्ती महत्त्वाची असून पाणीपुरवठा विभागाने दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेणे आवश्यक आहे.
संपादकीय भूमिकापाण्याची वानवा असतांना अशा प्रकारे पाणी वाया घालवणे अयोग्य आहे ! संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक ! पाण्याच्या टाक्यांच्या व्हॉल्व्हना गंज लागूनही त्यांची दुरुस्ती न करणारे कर्मचारी निष्क्रियच ! |