S Jaishankar : पाश्‍चात्त्य देशांना वाटते की, ते भारताला त्यांच्या इशार्‍यावर नाचवू शकतात !

परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी विदेशी प्रसारमाध्यमांना फटकारले !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

कोलकाता (बंगाल) – पाश्‍चात्त्य देशांना वाटते की, ते गेल्या २०० वर्षांपासून जग चालवत आहेत. त्यांना भारताला त्यांच्या इशार्‍यावर नाचवायचे आहे, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी भारतातील निवडणुकीविषयी विधाने करणार्‍या विदेशी प्रसारमाध्यमांना फटकारले. ‘ज्या देशांना निवडणूक निकालासाठी न्यायालयात जावे लागते, तेच देश आज भारताला निवडणुका घेण्याविषयी शहाणपणा शिकवत आहेत’, असेही जयशंकर म्हणाले. डॉ. जयशंकर त्यांच्या ‘व्हाय इंडिया मॅटर्स’ या पुस्तकाच्या बंगाली आवृत्तीच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तरे देत होते. या वेळी त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा केली.

जयशंकर पुढे म्हणाले की,

१. पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमांना भारताची सत्ता काही ठराविक लोकांनाच हाती द्यायची आहे आणि जेव्हा तसे घडत नाही, तेव्हा त्यांना ते आवडत नाही. ते त्यांच्या निवडणुकीच्या वृत्तसंकलनामध्ये काही लोकांना उघडपणे पाठिंबा देतात.

२. पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमे गेली २०० वर्षे वर्चस्वाचा खेळ खेळत आहेत. ते अनुभवी आणि हुशार आहेत. ते भारताविषयी नकारात्मक गोष्टी पसरवतात; कारण भारत त्यांच्या विश्‍वासाचे पालन करण्यास सिद्ध नाही.

पाकव्याप्त काश्मीरमधील लोक जम्मू-काश्मीरशी तुलना करतात !

जयशंकर पुढे म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या अशांतता आहे. तेथे रहाणारे लोक त्यांच्या आजच्या परिस्थितीची जम्मू-काश्मीरमध्ये रहाणार्‍या लोकांशी तुलना करत आहेत. त्यांना दिसत आहे की, जम्मू-काश्मीरमधील लोकांचा विकास होत आहे; मात्र ते तेथेच आहेत, जेथे काही दशकांपूर्वी होते. त्यांना वाईट वागणूक दिली जात आहे आणि ते गुलामगिरीचे जीवन जगत आहेत. पाकव्याप्त काश्मीर नेहमीच भारताचे होते आणि राहील.

अमेरिकेनेही चाबहार प्रकल्पाचे कौतुक केले होते !

चाबहार बंदर करारावर निर्बंध लादण्याच्या अमेरिकेच्या धमकीविषयी जयशंकर म्हणाले की, या प्रकल्पाचा संपूर्ण परिसराला लाभ होणार आहे. त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होण्याकडे लोकांनी लक्ष दिले पाहिजे. यापूर्वी अमेरिकेनेच चाबहार बंदर प्रकल्पाचे अनेकदा कौतुक केले आहे.