लोकसभेचे मतदान चालू असतांनाच ‘शहरात बाँबस्फोट घडवणार’, असा नियंत्रण कक्षाला खोटा दूरभाष !
पुणे – लोकसभेचे मतदान चालू असतांना शहरात ७ ठिकाणी बाँबस्फोट घडवणार असल्याचा दूरभाष पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. या धमकीच्या दूरभाषमुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची धावपळ झाली. पोलिसांनी तातडीने अन्वेषण केल्यावर पत्नी नांदायला येत नसल्याने एका व्यक्तीने रागाच्या भरात नियंत्रण कक्षाला दूरभाष केल्याचे निष्पन्न झाले. पोलीस नियंत्रण कक्षाला दूरभाष करून दिशाभूल केल्याप्रकरणी या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते. तांत्रिक तपासात दूरभाष करणार्याचे नाव समोर आले आहे. (संबंधितावर कठोर कारवाई केल्यास असा गैरप्रकार करण्यास कुणी धजावणार नाही ! – संपादक)