गुरुपौर्णिमेची सेवा दास्यभक्तीचा आदर्श ठेवून करूया ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सिंधुदुर्ग – सेवा हे एक गुरूंपर्यंत घेऊन जाणारे माध्यम आहे. सेवा करतांना मी गुरूंचा सेवक आहे, असा भाव ठेवावा. यासाठी गुरुपौर्णिमा ही एक चांगली संधी आहे. अध्यात्मप्रसार ही गुरूंच्या समष्टी रूपाची सेवा असून तो गुरुप्रसादच आहे. सेवा अहंकार न्यून करण्याचे एक माध्यम आहे. त्यामुळे हनुमंताप्रमाणे दास्यभक्तीचा आदर्श ठेवून सेवा करूया, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे जिज्ञासूंसाठी आयोजित केलेल्या ‘साधना सत्संग’ सोहळ्यात केले. सनातन संस्थेच्या वतीने जिल्ह्यात पिंगुळी, कणकवली आणि बांदा येथे जिज्ञासूंसाठी सत्संग सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले. या वेळी उपस्थित जिज्ञासूंनी त्यांचे अनुभव आणि साधनेविषयी आलेल्या अनुभूतींचे उत्स्फूर्तपणे कथन केले. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन केल्यामुळे झालेला लाभही काहींनी सांगितला.
मनोगत
१. सौ. स्नेहा प्रशांत हडकर : सत्संग सोहळ्यातून पुष्कळ शिकायला मिळाले. परिपूर्ण सेवा कशी करायची ? हे शिकायला मिळाले. सोहळ्यात अधूनमधून नामजप होत होता. सोहळा पुष्कळ चैतन्यदायी झाला.
२. अर्चना अशोक परब : ईश्वराला केलेल्या प्रार्थनेमुळे आणि नामजप केल्याने उत्साह अन् चैतन्य वाढते. मी नेहमी रुग्णाईत असते; पण हे सर्व प्रारब्धानुसार असल्याचे साधनेमुळे लक्षात आले.
३. श्री. बापू पांडुरंग परब : सनातन हे एक दैवत आहे. तिच्या मंदिरात एकदा प्रवेश केला की, जीवन निर्मळ होऊन जाते. मग शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक त्रास निर्माण होत नाहीत. सनातनमध्ये शिकवल्या जाणार्या नियमांचे पालन केले, तर जीवन सुखी होऊन जाईल.
४. श्री. विराज विजय परब : मला माझी कुलदेवता ठाऊक नव्हती आणि कुलदेवतेचे नावही ठाऊक नव्हते. मी सत्संगामध्ये आल्यापासून नामजप चालू केला. एके दिवशी मी कणकवली येथून प्रवास करतांना नांदगाव येथे थांबलो असता, एक अनोळखी व्यक्ती मला भेटली आणि तिने मला ‘तुझ्या कुलदेवतेचे नाव ठाऊक आहे का ?’, असे विचारले. मी ‘नाही’ म्हटले असता, त्यांनी मला माझ्या कुलदेवतेचे नाव सांगितले आणि ‘कुलदेवतेचा नामजप का करावा ?’, हेही सांगितले.
५. श्री. संजय इंदप : नामस्मरण केल्यामुळे राग येणे न्यून झाले. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्याने पूर्वजांचा त्रास न्यून झाला. नामजप करतांना घरातील वातावरण शांत आणि समाधानी वाटते. इतरही अनुभूती चांगल्या येतात. गौरी-गणपती सण चांगल्या प्रकारे साजरा केला जातो. पूर्वी गौरी-गणपती या सणांच्या वेळी नातेवाइकांमध्ये भांडणे व्हायची, ती बंद झाली.
६. श्री. विजय कृष्णा परब : एखादी चुकीची गोष्ट होत असेल, तर अंतर्मनात जाणीव होते. घरी असलेल्या गुरांवर कधी रागावलो, तर अंतर्मनात जाणीव होते, ‘मुक्या प्राण्यांना मारू नये. त्यांच्यामध्ये देव आहे.’ नामजपामुळे गुरुबळ वाढते. एखादी चुकीची गोष्ट घडण्याआधी देव सावध करतो.
७. श्री. अनिल विनायक परब : सत्संगात येण्यापूर्वी मी देवपूजा न करता मी कामाला जात असे. सायंकाळी घरी दिवाबत्ती, नामस्मरण करणे यांकडे दुर्लक्ष व्हायचे. सत्संगात जाऊ लागल्यानंतर मला माझ्यात पुष्कळ पालट जाणवू लागला. आता देवपूजा करून देवाला प्रार्थना करून कामाला जातो. दिवसभर नामजप करण्याची सवय झाली. यामुळे घरामध्ये चिडचिड न्यून झाली. आता सत्संग कधीही चुकवत नाही.