प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच !
सध्या देशभरात निवडणुकांचा जोरदार प्रचार चालू आहे. प्रत्येक लोकसभा क्षेत्रातून प्रतिदिन सहस्रो कार्यकर्ते सकाळ-संध्याकाळ जनसंपर्क आणि प्रचारफेर्या यांसाठी फिरत आहेत, निवडणूक प्रचारासाठी ठिकठिकाणी सभा सहस्रोंच्या उपस्थितीत घेतल्या जात आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि त्यातही यंदा तापमानाचा पारा भलताच चढल्याने उन्हाच्या झळा अधिक प्रमाणात जाणवत आहेत. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्याने शरिरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी लोक अधिकाधिक पाणी पित आहेत. प्रचारासाठी फिरणार्या कार्यकर्त्यांच्या सुविधेसाठी प्रत्येक पक्षाच्या कार्यालयांत आज पाण्याच्या बाटल्यांचे मनोरे रचलेले पहायला मिळत आहेत. प्रतिदिन सहस्रो बाटल्या मोकळ्या होऊन त्या इतरत्र टाकल्या जात आहेत. सभा संपल्यावर सर्वत्र पाण्याच्या बाटल्यांचाच खच पडलेला पहायला मिळत आहे. पक्षांच्या मिरवणुका, निवडणूक अर्ज भरण्यासाठी केले जात असलेले शक्तीप्रदर्शन चालू आहे. या वेळीही मिरवणूक मार्गात रस्त्याच्या कडेला सर्वत्र पाण्याच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या पहायला मिळत आहेत.
दुसरीकडे सध्या लगीनसराई चालू असल्याने शहराकडील भागांत होणार्या लग्नांत पिण्याच्या पाण्यासाठी सीलबंद पाण्याच्या बाटल्याच सर्रासपणे वापरल्या जात आहेत. या ठिकाणीही पाहुणे मंडळी गेल्यानंतर सर्वत्र बाटल्याचा खच पडलेला पहायला मिळत आहे. दोन्हीकडे मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्या सीलबंद पाण्याच्या बाटल्यांमुळे त्या बनवणार्या आस्थापनांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत. एकीकडे सरकार प्लास्टिक वापरावर अंकुश आणण्यासाठी जनप्रबोधन करत आहे आणि दुसरीकडे नेतेमंडळी पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा बेसुमार वापर करत आहेत ! प्लास्टिकच्या अतीवापरामुळे वातावरणात सर्वत्र प्लास्टिकचे अदृश्य सूक्ष्म कण पसरलेले आहेत, जे आपल्या डोळ्यांनी दिसत नसले, तरी वातावरणातील अन्न, पाणी आणि हवा यामंध्ये ते मिसळतात अन् या सर्व माध्यमांतून ते आपल्या शरिरात जातात. एक लिटर पाण्याच्या रिकाम्या बाटलीत प्लास्टिकचे अनुमाने २ लाख ४० सहस्र अत्यंत बारीक तुकडे असतात. प्रतिवर्षी जगभरात ४०० दशलक्ष मेट्रिक टन प्लास्टिक सिद्ध केले जाते, त्यांपैकी ३ कोटी टनांहून अधिक प्लास्टिक पाण्यात टाकले किंवा भूमीत पुरले जाते. अनेक वर्षे प्लास्टिक नष्ट होत नसल्याने ते हवेद्वारे आपल्या श्वासात प्रवेश करते, मातीत मिसळते आणि पिकांच्या अन् झाडांच्या माध्यमातून ते आपल्या अन्नात प्रवेश करते. मानवाने मानवाच्या सुविधेसाठी निर्माण केलेला प्लास्टिकचा भस्मासुर शेवटी मानवालाच भस्म करत आहे !
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई