मुंबईसह राज्यातील सर्व होर्डिंगचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करा !
सुराज्य अभियानाचे मुख्यमंत्री आणि मुंबईचे आयुक्त यांना आवाहन !
मुंबई – घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लेखी, तर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांना १४ मे या दिवशी ऑनलाईन निवेदन दिले आहे. यामध्ये मुंबईसह राज्यातील सर्व होर्डिंगचे स्थापत्य परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती सुराज्य अभियानाचे समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ला दिली.
एवढी भव्य होर्डिंग असूनही मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकार्यांना हे का लक्षात आले नाही किंवा त्यांनी जाणीवपूर्वक त्यांकडे दुर्लक्ष केले ? याविषयी चौकशी करून दोषी अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी सुराज्य अभियानाकडून करण्यात आली आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये समुद्री वादळी वार्यांचा वेग लक्षात घेऊन फ्लेक्स किंवा होर्डिंग लावण्यासाठी अनुमती दिली जाते का ? याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. अनेकदा होर्डिंगमुळे रस्त्यावरील सिग्नल झाकले जातात. वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. याविषयी कारवाई करण्यात यावी. महामार्गावर होर्डिंग किंवा फ्लेक्स यांना अनुमती देतांना ते निखळून पडल्यास त्यातून कोणता धोका उद्भवू शकतो, याचाही विचार होणे आवश्यक आहे. संभाव्य दुर्घटना लक्षात घेऊन राज्यातील सर्व होर्डिंगचे ठराविक कालावधीनंतर स्थापत्य परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात यावे आणि त्याचा अहवाल शासनाच्या संबंधित विभागाकडे पाठवण्यात यावा, अशी मागणीही या निवेदनात सुराज्य अभियानाकडून करण्यात आली आहे.