असगोली (गुहागर) येथील सतेश घाणेकर यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या पत्नीचे पोलिसांना निवेदन  

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा !

गुहागर – तालुक्यातील असगोली येथील रस्त्यावरील केबलमुळे दुचाकी अपघातात मृत्यू झालेल्या सतेश घाणेकर यांची पत्नी श्रीमती वैष्णवी घाणेकर यांनी अपघाताला कारणीभूत असलेला ट्रकचालक आणि केबल उभारणार्‍या आस्थापन यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी गुहागर पोलिसांत एका निवेदनाद्वारे केली आहे.

श्रीमती वैष्णवी घाणेकर यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, असगोली येथील सतेश घाणेकर (वय ३८ वर्षे) हे १८ एप्रिलच्या सायंकाळी मुलगा श्रीवांश घाणेकर आणि पांडुरंग घर्वे यांच्यासह गुहागर येथून दुचाकीवरून असगोली येथील स्वत:च्या घरी येत होते. या मार्गावर असगोली मधलीवाडी येथे समोरून एक ट्रक भरधाव वेगाने गुहागरच्या दिशेने येत होता. याच ठिकाणाहून ग्रामपंचायत येथे जाणारी महानेट आस्थापनाची ‘वायफाय’ची वायर (केबल) रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या खांबांवर बर्‍याच दिवसांपासून खाली लोंबकळत होती. ही लोंबकळणारी केबल भरधाव येणार्‍या ट्रकच्या वरच्या बाजूला अडकून ताणल्याने तुटली; मात्र ही केबल दुचाकीवरून प्रवास करणारे सतेश घाणेकर यांच्या दुचाकीवर आदळली होती. यामुळे दुचाकीचा भीषण अपघात घडला. यामध्ये घायाळ झालेले सतेश घाणेकर यांचे उपचाराच्या वेळी निधन झाले. ४ वर्षांचा माझा मुलगा श्रीवांश आणि पांडुरंग घर्वे हे गंभीर घायाळ असून अद्यापही ते उपचार घेत आहेत. या अपघातामुळे कुटुंबाचा आधारच हरपला आहे. या अपघाताला आणि पतीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या ट्रकचालक, मालक, महानेट आस्थापन आणि ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती आहे.