मूतखडा होण्याची कारणे, लक्षणे आणि घ्यावयाची काळजी !
मूत्रवहन संस्थेच्या महत्त्वाच्या आजारांपैकी आणि बर्याच जणांमध्ये आढळून येणारा त्रास, म्हणजे मूतखडा होणे. याची मुख्य कारणे, लक्षणे आणि घ्यावयाची काळजी यांविषयी आजच्या लेखात बघूया.
१. मूतखडा होण्याची मुख्य कारणे
अ. अतीउष्ण, मसालेदार पदार्थ खाणे, तसेच ज्या पदार्थांमध्ये अधिक प्रमाणात क्षार असतात, अशा पदार्थांचे अतीप्रमाणात सेवन करणे. उदाहरणार्थ टोमॅटो, कोबी, वांगी, अळू, काकडी इत्यादी. दूध आणि दुधापासून केलेले मिठाईचे पदार्थ अतीप्रमाणात खाणे अन् जोडीला पाणी कमी पिणे.
आ. ‘बोअरवेल’च्या (कूपनलिकेच्या) पाण्यामध्ये क्षार अधिक असतात. अशा पाण्यामुळेही मूतखडा होऊ शकतो. क्षार असणार्या पाण्याच्या तळाशी जशी खर (थर) जमा होते, त्याच पद्धतीने मूत्रपिंडामध्ये रक्त गाळण्याची प्रक्रिया होत असतांना क्षार जमा होऊन मूतखडा निर्माण होतो.
इ. रखरखीत उन्हात पुष्कळ फिरणे, कामानिमित्त उन्हात फिरावे लागणे.
ई. लघवीचा वेग आलेला असतांना वेळेत न जाणे.
उ. तहान लागलेली असतांना वेळेत पाणी न पिणे वा पुष्कळ कमी पाणी पिणे.
ऊ. ‘थायरॉईड’ ग्रंथीची अकार्यक्षमता (Hypothyroidism) असल्यास अशा रुग्णांमध्ये मूतखड्याचा त्रास होण्याची शक्यता असते. ‘थायरॉईड’ ग्रंथीच्या मागे ‘पॅराथायरॉईड’ ग्रंथी असतात. त्यांचे असंतुलनही मूतखडा सिद्ध होण्यास कारणीभूत ठरू शकते.
ए. कॅल्शियमच्या गोळ्या दीर्घकाळ घेणे.
सध्या बरेच जण मनानेच कॅल्शियमच्या गोळ्या दीर्घकाळ घेतांना दिसतात. यामध्ये वैद्यकीय सल्ला घेऊन गोळ्या घेणारे अत्यल्प असतात. सांधेदुखी किंवा वेदना जाणवायला लागल्या की, बरेच जण मनानेच कॅल्शियम चालू करतात. गोळ्या किती दिवस आणि किती घ्यायला हव्यात ? याचा विचार केला जात नाही. महिनोन्महिने कॅल्शियमच्या गोळ्या घेत असलेले रुग्णसुद्धा आढळून येतात.
२. मूतखडा होण्याची लक्षणे
मूतखडा निर्माण झाल्यावर कोणती लक्षणे निर्माण होतात, ते जाणून घेऊया.
अ. मूतखडा होण्याचे पहिले लक्षण म्हणजे वेदना. पाठीमध्ये बरगडीच्या खालच्या बाजूला वेदना असतात. या वेदना पाठीकडून पोटाकडे परावर्तित होऊ शकतात. चालतांना, उड्या मारतांना, जिने चढतांना वेदना पुष्कळ जाणवतात. काही वेळा वेदनांची तीव्रता इतकी असते की, रुग्णास उलटीही होते. घामही भरपूर येतो.
आ. काही वेळेस मूत्रप्रवृत्ती लाल रंगाची होते. अडखळत लघवीला होणे, हे लक्षणही काही वेळेला आढळून येते. वेदना आणि लघवी अडखळत होणे, ही दोन्ही लक्षणे एकत्र असतील, तर वैद्यांकडेच जावे.
इ. काही वेळा मूतखडा आकाराने मोठा असल्यास पायावर आणि चेहर्यावर सूज येऊ शकते. क्ष-किरण (एक्स-रे) आणि सोनोग्राफी यांद्वारे मूतखड्याचे १०० टक्के निदान होऊ शकते. सोनोग्राफीद्वारे मूतखडा कुठे आहे ? त्याचा आकार किती मोठा आहे ? मूत्रपिंडांना सूज आहे का ? हे सर्व कळते. मूत्रपिंडांपासून निघणार्या नळ्यांमध्ये मूतखडा असल्यास तो सोनोग्राफीमध्ये दिसत नाही.
३. मूतखडा झाल्यास घ्यावयाची दक्षता
मूतखडा झाल्यास काय करावे आणि काय करू नये ? याविषयीची माहिती पुढीलप्रमाणे –
अ. मूतखडा होऊ नये म्हणून योग्य प्रमाणात पाणी पिणे महत्त्वाचे. इथे योग्य प्रमाणात असा उल्लेख करण्याचा मुख्य उद्देश, म्हणजे ‘काही जणांना भरपूर पाणी प्यावे’, असा समज होऊ शकतो; पण आयुर्वेदानुसार अतीप्रमाणात पाणी पिण्यापेक्षा प्रमाणात पाणी पिणे, हे अधिक महत्त्वाचे आहे. जर लघवी गडद पिवळ्या रंगाची होत असेल, तर पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे. लघवी पांढर्या रंगाची होत असेल, तर आपण योग्य प्रमाणात पाणी पित आहोत, असे समजावे. घराबाहेर पडतांना पाणी पिऊनच निघावे.
आ. लिंबाचे सरबत अधूनमधून प्यावे.
इ. पालक आणि अळू यांच्या भाज्यांमध्ये क्षारांचे प्रमाण अधिक असते; म्हणून या भाज्या करतांना चिंच, ताक असे आंबट पदार्थ घालूनच या भाज्या कराव्यात. आंबट पदार्थांमुळे या भाज्यांमधील क्षार विरघळतात.
ई. आयुर्वेदानुसार कुळीथ हे मूतखडा विरघळण्यासाठी उत्तम. मूतखडा झाल्यास अथवा होऊ नये म्हणून कुळीथाचे विविध पदार्थ खावेत. उदाहरणार्थ कुळीथ पिठले, कुळीथ शिजवून सूप, कुळीथाची उसळ इत्यादी.
उ. १ लिटर पाण्यात पाव चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर, पाव चमचा गोखरूचे चूर्ण घालून ५ मिनिट उकळावे. गार झाल्यावर चवीनुसार खडीसाखर घालून हे पाणी अधूनमधून प्यावे. (हा औषधोपचार नसल्याने फक्त वैद्यकीय सल्ल्यानेच करावा.)
ऊ. चिंच ही मूळातच मूत्राचे प्रमाण वाढवणारी आहे. त्यामुळे आहारात चिंचेची चटणी वा चिंचेचे सरबत असे घेऊ शकतो.
ए. जेवणात दुधी भोपळा, मेथी, अंबाडी, बटाटा या भाज्या खाऊ शकतो. ज्वारीची भाकरी, दोडक्याची भाजी, ताक यांचा आहारात समावेश करावा.
ऐ. तांदूळही मूत्राचे प्रमाण वाढवणारे असल्याने भात अवश्य खावा.
ओ. लघवी कमी होणे, लघवी करतांना वेदना होणे असे असल्यास एक दिवस लंघन करून ताकावर रहावे.
औ. ज्या पदार्थांमध्ये क्षार अधिक असतात, असे अळू, काकडी, टोमॅटो, वांगी, ढोबळी मिरची असे पदार्थ टाळावेत.
– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे (१३.५.२०२४)