साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार
कोकणात यावर्षी पावसाळ्यातील २२ दिवस येणार समुद्राला मोठी भरती
रत्नागिरी – कोकणात यावर्षी पावसाळ्यातील २२ दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. या काळात अनुमाने साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे.
जेव्हा समुद्राला मोठी भरती येते, तेव्हा किनारी भागांत आपत्तीदायक घटना घडतात. यासाठी किनार्यावरील गावांना सतर्क ठेवण्यासाठी हवामान विभागाकडून सागरी भरतीचा तिमाही आढावा घेतला जातो. प्रतिवर्षी पावसाळ्यात समुद्राला मोठी भरती येत असते. या भरतीपासून सर्वांना सतर्क रहाता यावे, यासाठी पावसाळापूर्व समुद्राला येणार्या संभाव्य मोठ्या भरतीचे अंदाजपत्रक आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत घोषित केले जाते. मोठी भरतीच्या दिवशी मासेमार, तसेच किनारपट्टीवरील नागरिक यांना सतर्कतेचे आदेश देण्यात येतात. त्यानुसार यावर्षीच्या पावसाळ्यात २० सप्टेंबरला सर्वांत मोठी भरती येणार आहे. यावर्षी २२ दिवस मोठी भरती येणार असून जून महिन्यात ७, जुलै ४ ऑगस्ट ५ आणि सप्टेंबर महिन्यातील ६ दिवसांचा समावेश आहे. या दिवशी समुद्राला साडेचार मीटरपेक्षा अधिक मोठी भरती येणे अपेक्षित आहे.
मोठी भरती असतांना या भरतीचे पाणी किनारपट्टीवरील भागांत शिरण्याची शक्यता असते. या कालावधीत समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे शेतात खारेपाणी शिरून भूमी नापीक होऊ शकते. सखल भागांत पूरसदृश्य परिस्थिती उद्भवू शकते. याच कालावधीत मोठा पाऊस पडल्यास, पाण्याचा निचरा होण्यास अडसर होतो. ज्यामुळे नद्या किंवा नाल्यांना पूरही येऊ शकतो आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकते.